Pakistan vs Afghanistan T20 Series: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात यूएईमध्ये खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत पाकिस्तानची अवस्था वाईट आहे. अफगाणिस्तान संघाने मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे. या मालिकेत पाकिस्तान संघाचा फलंदाज अब्दुल्ला शफीक वाईटरित्या फ्लॉप ठरला. त्याच्या नावावर एक लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झालेला अब्दुल्ला शफीक टी-२०च्या सलग चौथ्या सामन्यात गोल्डन डक ठरला आहे. यासह, सलग चार टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गोल्डन डकवर आऊट होणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे, अशा प्रकारे शफीकच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.
२०२० मध्ये दोनदा झाला होता गोल्डन डक –
पाकिस्तानचा युवा फलंदाज अब्दुल्ला शफीक २०२० साली सलग दोन टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गोल्डन डकवर बाद झाला होता. त्यामुळे त्याला पाकिस्तान संघातून वगळण्यात आले. त्यानंतर तब्बल ३ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर त्याने शानदार खेळ दाखवत पाकिस्तान संघात पुनरागमन केले, परंतु हा फलंदाज टी-२० मध्ये पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे. गेल्या दोन सामन्यात तो गोल्डन डकवर बाद झाला आहे.
हेही वाचा – WPL 2023 Final MI vs DC: विजेतेपद पटकावल्यानंतर हरमनप्रीत कौरने दिली महत्वाची प्रतिक्रिया; म्हणाली, “आम्ही खूप दिवसांपासून…”
गेल्या दोन सामन्यात अब्दुल्ला शफीकला या गोलंदाजांनी बाद केले –
अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात अब्दुल्ला शफीक डावाच्या पहिल्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही त्याला त्याची चूक सुधारता आली नाही. पहिल्या सामन्यात त्याला अजमतुल्लाहने तर दुसऱ्या सामन्यात फजलहक फारुकीने बाद केले.
कोण आहे अब्दुल्ला शफीक?
अब्दुल्ला शफीक हा पाकिस्तानचा उजव्या हाताचा फलंदाज आहे. नुकत्याच झालेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याने धमाकेदार कामगिरी केली होती. त्याने पाकिस्तानसाठी आतापर्यंत १२ कसोटी सामन्यांच्या २३ डावात ९९२ धावा केल्या आहेत. कसोटीत त्याची सरासरी ४७.२४ आहे, तर एकमेव एकदिवसीय सामन्यात तो २ धावा करून बाद झाला. या खेळाडूने ५ टी-२० मध्ये केवळ ४१ धावा केल्या आहेत. ज्या त्याने एका सामन्यात केल्या आहेत, उर्वरित चार सामन्यांमध्ये हा खेळाडू पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता बाद झाला आहे.
हेही वाचा – SA vs WI 2nd T20: रोव्हमन पॉवेल सोबत घडली भयानक घटना! पाच वर्षांच्या बॉल बॉयला वाचवायला गेला अन्… पाहा VIDEO
शफिकची अवस्था सूर्यापेक्षाही वाईट –
अब्दुल्ला शफीकची अवस्था टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादवपेक्षाही वाईट झाली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग तीन सामन्यांत सूर्या गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेतील एकाही सामन्यात त्याला खाते उघडता आले नाही. तो प्रत्येक सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झाला.