ऑलिम्पिकमध्ये इतर भारतीय खेळाडूंना संधी मिळण्यासाठी
आशियाई नेमबाजी स्पध्रेतून माघार
#ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाजपटू अभिनव बिंद्राने जानेवारीमध्ये होणाऱ्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता नेमबाज स्पध्रेतून माघार घेतली आहे. यापूर्वीच रिओ ऑलिम्पिकमध्ये स्थान निश्चित करणाऱ्या बिंद्राने भारताच्या इतर नेमबाजांना ऑलिम्पिक पात्रता मिळवता यावी, याकरिता हा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा २५ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत येथील डॉ. कर्नी सिंग शूटिंग रेंजवर होणार आहे.
‘‘माझ्या गैरहजेरीमुळे भारताच्या इतर नेमबाजपटूला ऑलिम्पिक पात्रता मिळवणे शक्य होईल. किमान पात्रता गुणसंख्या (एमक्यूएस) प्रकारात मी नेमबाजी करत नाही,’’ असे बिंद्राने स्पष्ट केले. बिंद्राने २००८च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताला सुवर्णपदक पटकावून दिले आहे. नवी दिल्लीत पार पडणाऱ्या आशियाई नेमबाज स्पध्रेतून ३५ खेळाडूंना ऑलिम्पिकचा उंबरठा पार करण्याची संधी आहे. ही स्पर्धा शॉटगन, रायफल आणि पिस्तूल अशा तीन प्रकारांत पार पडणार आहे.
बिंद्राप्रमाणे ऑलिम्पिक पात्रता निश्चित केलेल्या अपूर्वी चंडेला व मैराज खान यांचा खेळ आशियाई स्पध्रेत पाहता येणार नाही. तसेच कोरियाचा सध्याचा ऑलिम्पिक आणि विश्वविजेता जाँग ओह जिन यानेही स्पध्रेतून माघार घेतली आहे. नोव्हेंबरमध्ये कुवेत येथे झालेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पध्रेत त्याने सहभाग घेतला होता. ‘‘दिल्लीत होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पध्रेत मी सहभाग घेणार नाही. कोरियाच्या ज्या खेळाडूंना अजूनही ऑलिम्पिक पात्रता निश्चित करता आलेली नाही, ते या स्पध्रेत सहभाग घेतील,’’ अशी माहिती जाँगने दिली.
भारताने या स्पध्रेकरिता ६४ नेमबाजपटूंचा चमू पाठविण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये गगन नारंग, जितू राय, प्रकाश नजप्पा, चेन सिंग आणि गुरप्रीत सिंग या ऑलिम्पिक पात्रता निश्चित केलेल्या खेळाडूंसह विजय कुमार, हीना सिधू आणि मानवजीत संधू यांचा समावेश आहे.