ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा व विश्वविजेती हीना सिद्धू यांच्यावर आगामी जागतिक नेमबाजी स्पर्धेसाठी भारताची भिस्त आहे. ही स्पर्धा ऑलिम्पिक पात्रता फेरी असल्यामुळे त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
भारतीय रायफल नेमबाजी संघटनेने एका पत्रकाद्वारे भारतीय संघ जाहीर केला. महिलांच्या विभागात हीना हिच्याबरोबरच लज्जा गोस्वामी, अनीसा सय्यद, राही सरनोबत, शगुन चौधरी यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल विभागात बिंद्रा याच्याबरोबर संजीव रजपूत, रवीकुमार हे खेळाडू आपले नशीब आजमावणार आहेत. रॅपिड फायर पिस्तूल विभागात ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता विजयकुमार, हरप्रितसिंग व गुरप्रितसिंग यांना संधी मिळाली आहे. सेंटर फायर पिस्तूलमध्ये पेम्बा तमांग व गुरप्रितसिंग यांच्याकडून भारतास चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ट्रॅपमध्ये मानवजितसिंग संधू, किनान चिनाय, आर.पृथ्वीराज हे प्रतिनिधित्व करीत आहेत. डबल ट्रॅपमध्ये अंकुर मित्तल, मोहंमद असाब, संग्राम दहिया यांच्यावर भारताची भिस्त आहे. स्टॅँडर्ड पिस्तूलमध्ये समरेश जंग, महावीरसिंग व गुरप्रितसिंग यांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

Story img Loader