|| धनंजय रिसोडकर
सुवर्णविजेता नेमबाज अभिनव बिंद्राला विश्वास
बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान मी सुवर्णपदक मिळवेन, असे कुणालाही वाटले नव्हते. पण आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्या सुवर्णमय इतिहासाची पुनरावृत्ती निश्चितपणे होईल, असा विश्वास २००८च्या ऑलिम्पिकचा सुवर्णविजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याने व्यक्त केला.
स्पोर्ट्स फॉर ऑल (एसएफआय) स्पर्धेच्या पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने डी. वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सोहळ्यानंतर बिंद्रा बोलत होता. नेमबाजीच्या खेळात गेल्या १०-१५ वर्षांत खूप बदल झाले असून खेळाचा अधिकाधिक प्रसार होत असल्याबद्दल बिंद्राने समाधान व्यक्त केले. खेळाडू हे नेहमी आशेवरच जगत असल्याने येत्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पुन्हा सुवर्णपदक मिळेल, असेही त्याने नमूद केले.
‘‘भारताकडे सध्या ८ ते १० चांगल्या दर्जाचे नेमबाज असून त्यातून ऑलिम्पिकसाठी कोण पात्र होतो आणि तो अंतिम फेरीपर्यंत वाटचाल कशी करतो, त्यावर त्याच्या यशाचे प्रमाण अवलंबून असेल. खेळाडू घडण्यासाठी त्यांच्यावर लहानपणापासूनच मेहनत घेतली जाणे आवश्यक आहे. आपल्याकडे पालकांमध्ये आता बऱ्यापैकी जागरूकता आल्याने त्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत, ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे. बालवयात खेळत असताना काही गोष्टी मनासारख्या घडत नसतात, त्या वेळी खेळ सोडून देण्याचे विचार मनात येतात. मात्र, त्याऐवजी आपल्या खेळातील उणिवा शोधून त्यावर मात करण्याला प्राधान्य द्यायला हवे. तसेच लहानपणापासूनच प्रत्येक खेळाडूने त्याची बौद्धिक क्षमता वाढवण्यावर भर द्यायला हवा. ही क्षमता आपल्यालाच वाढवायची असते. त्यासाठी प्रत्येक खेळाडूचे मनोधैर्य अत्यंत महत्त्वाचे असून अटीतटीच्या प्रसंगी मन शांत आणि स्थिर ठेवण्याचे कसब अंगी बाणवणे आवश्यक आहे,’’ असेही बिंद्राने सांगितले.
‘‘बालवयातील खेळाडूंचे शरीर आणि मन सारखे बदलत असते, त्यामुळे त्या सगळ्या बाबींचा मुलांच्या कारकीर्दीवरही परिणाम होत असतो. त्यामुळे त्या वयात खेळाडूंना योग्य प्रकारे जपले पाहिजे, असे वाटते. उगवत्या नेमबाजांसाठी काही चांगल्या योजना आखण्याची आणि त्यांना त्याच काळात शिष्यवृत्ती देण्यात यावी. भारतासारख्या देशात हे खूप मोठे आव्हान आहे, असे मला वाटते. आताच्या काळात खूप अधिक ज्ञान आणि माहिती उपलब्ध होऊ लागली आहे. तंत्रज्ञानातही वेगाने प्रगती झाली आहे. त्यामुळे खेळाडूंना त्यांची प्रगती साधणे अधिक सुलभ बनले आहे,’’ असेही बिंद्राने नमूद केले.