‘गुलाबी गँग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूर पिंक पँथर्सने साखळी फेरीतील आठ शहरांमध्ये राखलेला विजयी अश्वमेध रविवारी मुंबईतसुद्धा राखला आणि पहिल्यावहिल्या प्रो-कबड्डी लीगवर विजेतेपदाचा ‘अभिषेक’ केला. त्यानंतर वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल क्रीडा संकुलावर गुलाबी जल्लोषाला पारावार उरला नव्हता. जयपूरने यजमान यु मुंबाचा ३५-२४ असा पराभव करून जेतेपदावर नाव कोरले. सामना संपल्याची शिट्टी वाजली आणि जयपूरचा संघमालक अभिषेक बच्चन, पत्नी ऐश्वर्या हे सारे जयपूरच्या विजयी उत्सवात सामील झाले.
दिल कबड्डी!
कबड्डीची आता थेट क्रिकेटशी स्पर्धा!
अंतिम सामन्याच्या दृष्टीने जयपूरने आक्रमणापेक्षा आपल्या पोलादी बचावावर भर दिला आणि त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो उजवा कोपरारक्षक प्रशांत चव्हाण. मूळ लिलावात समावेश नसलेल्या प्रशांतला खरे तर जयपूरच्या संघात प्रो-कबड्डी सुरू होण्याच्या काही दिवस अगोदर बदली खेळाडू म्हणून संधी मिळाली. पण महाराष्ट्राच्या या सुपुत्राने मिळालेल्या संधीचे सोने केले.
प्रारंभीपासूनच जयपूरकडून मणिंदर सिंग आणि जसवीर सिंग तर मुंबईकडून अनुप कुमार आणि शब्बीर बापू शरफुद्दीन यांच्यातील चढायांनी या सामन्यात रंगत आणली. परंतु १३व्या मिनिटाला जयपूरने रिशांकची पकडी करून पहिला लोण चढवला आणि आघाडी मिळवली. पहिल्या सत्रातील अखेरच्या चढाईत अनुप कुमारची उजवा कोपरारक्षक प्रशांत चव्हाणने एकटय़ाने पकड करण्याची करामत दाखवली. पूर्वार्धात जयपूरकडे १७-१४ अशी आघाडी होती.
मग उत्तरार्धात २९व्या मिनिटाला जयपूरने दुसरा लोण चढवला. छोटय़ा चणीच्या प्रशांतने शब्बीर, पवन कुमार आणि अनुपच्या केलेल्या पकडी डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या होत्या. जयपूरकडून मणिंदर सिंग आणि राजेश नरवालने चढायांमध्ये महत्त्वपूर्ण गुण घेतले, तर क्षेत्ररक्षकांना धडकी भरवणाऱ्या चढाया करणाऱ्या जसवीर सिंगने चढायांमध्ये गुण घेण्यापेक्षा मैदानावर वेळ काढत प्रतिस्पध्र्यावर दडपण आणण्याचे धोरण स्वीकारले. मुंबईकडून अनुपने (११ गुण) पराभव टाळण्याचे शर्थीने प्रयत्न केले.
त्याआधी, कर्णधार राकेश कुमारच्या अनुपस्थितीत भक्कम बचावाच्या बळावर पाटणा पायरेट्सने बंगळुरू बुल्सचा २९-२२ असा पराभव करून तिसरे स्थान पटकावले. पाटण्याने प्रारंभीपासूनच पकडींचे गुण मिळवण्याचा सपाटा लावला आणि मध्यंतराला १७-९ अशी आघाडी घेतली होती. पाटण्याकडून रवी दलाल आणि संदीप नरवाल यांनी चढायांचे गुण मिळवले.
स्पध्रेचे मानकरी
सर्वोत्तम चढाईपटू : राहुल चौधरी (तेलुगू टायटन्स)
सर्वोत्तम पकडपटू : मनजीत चिल्लर (बंगळुरू बुल्स)
सर्वात मौल्यवान खेळाडू : अनुप कुमार (यु मुंबा)
“मी भावनिकदृष्टय़ा विचार करणारा आहे. जयपूर संघाचे मालकत्व घेण्याचा निर्णयही भावनिकच होता. कर्णधार नवनीतच्या नेतृत्वाखाली आणि प्रशिक्षक भास्करन यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संघाने शानदार कामगिरी केली. विजयाचे श्रेय खेळाडूंच्या प्रयत्नांना आहे. आम्ही जेतेपद जिंकले असले तरी हा कबड्डीचा विजय आहे. आजचा दिवस कबड्डीसाठी ऐतिहासिक क्षण आहे. एका महिन्याच्या कालावधीत कबड्डीपटूंना लोक ओळखू लागले , हे जेतेपदाइतकेच महत्त्वाचे आहे.”
– अभिषेक बच्चन, जयपूर पिंक पँथर्सचा सहमालक
“गुणफरकानुसार आम्ही सहज जिंकलो, असे वाटू शकते. परंतु हा विजय सोपा नव्हता. यू मुंबा मातब्बर संघ आहे. अंतिम लढतीसाठी आम्ही योजना आखल्या होत्या. त्यानुसार खेळ केल्यानेच आम्ही जिंकलो. एका महिन्याच्या कालावधीत कबड्डीपटूंचे आयुष्य बदलले आहे. आठही शहरांमध्ये ज्या पद्धतीने प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला तो भारावून टाकणारा होता. अनुप कुमारला रोखणे महत्त्वाचे होते. हारजीत स्पर्धेचा भाग आहे. ऋणानुबंध कायम राहतो, तो महत्त्वाचा आहे.”
नवनीत गौतम, जयपूर पिंक पँथर्सचा कर्णधार