डावखुरा फलंदाज अभिषेक नायरने दमदार नाबाद शतक साकारले. त्यामुळेच मुंबईला राजस्थानविरुद्धच्या अ गटातील रणजी करंडक सामन्यात पहिल्या डावात आघाडी घेता आली. या आघाडीच्या बळावर मुंबईला तीन गुण कमवता आले.
राजस्थानच्या पहिल्या डावातील ४७८ धावसंख्येला प्रत्युत्तर देताना चौथ्या दिवसअखेर मुंबईने १९०.२ षटकांत सर्वबाद ५७९ अशी मजल मारली. या तीन गुणांनिशी दोन सामन्यांद्वारे मुंबईने आपली गुणसंख्या सहापर्यंत नेली आहे. तथापि, राजस्थानला दुसऱ्या सामन्यातही एकच गुण मिळवता आला आहे.
रविवारच्या ३ बाद ३६० धावसंख्येवरून मुंबईने आपल्या डावाला सोमवारी प्रारंभ केला. परंतु हिकेन शाह (३१० चेंडूंत १९ चौकारांसह १४० धावा), क्षेमल वायंगणकर (२५) आणि सूर्यकुमार यादव (११) हे तीन महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यामुळे मुंबईची ६ बाद ४२० अशी अवस्था झाली. दोन नवे फलंदाज मैदानावर होते, तर मुंबईचा संघ ५८ धावांनी पिछाडीवर होता. परंतु नायरने जिद्दीने मैदान लढवले. त्याने अंकित चव्हाण(२६)सोबत ७० धावांची भागीदारी रचून मुंबईला पहिल्या डावात आघाडी मिळवून दिली. त्यानंतर तळाच्या फलंदाजांना साथीला घेऊन त्याने चांगल्या भागीदाऱ्या रचत संघाला पावणेपाचशे धावसंख्येपर्यंत पोहोचवले. नायरने १६४ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकारानिशी नाबाद १०५ धावा केल्या. यजमानांकडून अंकित चौधरी आणि रितुराज सिंग यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा