वानखेडे स्टेडियमवरील रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबईचा धावांचा ‘अभिषेक’ दुसऱ्या दिवशीही अविरत सुरू होता. वसिम जाफर आणि सचिन तेंडुलकर यांच्यापाठोपाठ अभिषेक नायरनेही क्रिकेटरसिकांना शतकाची मेजवानी पेश केली. त्यामुळेच दुसऱ्या दिवसअखेर मुंबईने ६ बाद ५२४ धावांचा डोंगर उभारला.
सकाळच्या सत्रात जाफरने नाइट वॉचमन धवल कुलकर्णीच्या साथीने अर्धा तास खेळून काढला. पण गगनदीप सिंगने जाफरचा (१५०) त्रिफळा उडवून ही जोडी फोडली. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या अभिषेकने दणक्यात आपले खाते उघडले आणि चालू रणजी हंगामातील तिसरे शतक झळकावत मुंबईचा धावांचा आलेख उंचावण्यात सिंहाचा वाटा उचलला. अभिषेकने ३४३ मिनिटे आणि २१७ चेंडूंचा सामना करीत १२ चौकारांच्या सहाय्याने नाबाद १२२ धावांची आपली शानदार खेळी साकारली.
अभिषेकने धवलसोबत पाचव्या विकेटसाठी ७०, आदित्य तरेसोबत सहाव्या विकेटसाठी १२३ आणि अंकित चव्हाणसोबत सातव्या विकेटसाठी ४५ धावांची नाबाद भागीदारी केली. या तीन महत्त्वाच्या भागीदाऱ्या मुंबईसाठी महत्त्वाच्या ठरल्या. आदित्य तरेने ६४ धावांची अर्धशतकी खेळी उभारली. अभिमन्यू चव्हाणच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक पिनल शाहकडे तो झेल देऊन माघारी परतला. बडोद्याचा कर्णधार युसूफ पठाणने दुसऱ्या दिवशीही पहिल्या स्लिपमध्ये झेल सोडण्याची परंपरा जपली. सोमवारी धवल कुलकर्णीला त्याने जीवदान दिले. पण त्यानंतर धवल २७ धावांवर तंबूत परतला. मुर्तूजा वहोराने ८९ धावांत ३ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई (पहिला डाव) : १८० षटकांत ६ बाद ५२४ (वसिम जाफर १५०, सचिन तेंडुलकर १०८, अभिषेक नायर खेळत आहे १२२, आदित्य तरे ६४; मुर्तूजा वहोरा ३/८९)

भारतीय संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न -नायर
बडोद्याविरुद्धचा महत्त्वाचा सामना जिंकण्यासाठी मोठी धावसंख्या उभारण्याचे आम्ही लक्ष्य ठरविले आहे. मिळालेली संधी गमवायची नाही, ही खूणगाठ मी मनाशी बांधली होती. त्यामुळेच हे शतक साकारता आले. सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करीत भारतीय संघात स्थान मिळविण्याचे स्वप्न मी जोपासले आहे, अशी प्रतिक्रिया अभिषेक नायरने शतकानंतर व्यक्त केली. मला फलंदाजीकरिता सध्या लाभत असलेले माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांचे मार्गदर्शन फायदेशीर ठरत आहे, असे नायर पुढे म्हणाला.

Story img Loader