Abhishek Sharma becomes the 4th Indian to get out on a duck in T20I debut : झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे पार पडला. या साम्यात अभिषेक शर्मा. रियान पराग आणि ध्रुव जुरेल यांना पदार्पणाची संधी मिळाली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा शुबमन गिलचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सिद्ध केला आणि झिम्बाब्वेला ११५ धावांवर रोखले. पण टीम इंडियाची धावांचा पाठलाग करताना सुरुवात खूपच खराब झाली. पदार्पणाच्या सामन्यात अभिषेक शर्मा केवळ ४ चेंडू खेळू शकला आणि खाते न उघडता आऊट झाला. यानंतर चाहते अभिषेक शर्माला महेंद्रसिंग धोनीची आठवण करुन देत आहेत.
अभिषेकला खातेही उघडता आले नाही –
आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन करणारा २३ वर्षीय स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात फ्लॉप ठरला. झिम्बाब्वेविरुद्धच्या पदार्पणाच्या टी-२० सामन्यात अभिषेक कर्णधार शुबमन गिलबरोबर सलामीला आला आणि फक्त चार चेंडू खेळून बाद झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. त्याला आयपीएल २०२४ मधील कामगिरीच्या जोरावर त्याला झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात स्थान मिळाले आहे.
आता पदार्पणाच्या सामन्यात अभिषेक शून्यावर बाद झाल्यानंतर चाहते त्याला धोनीची आठवण करुन देत आहेत. सोशल मीडियावर चाहते अभिषेक शर्माला महान महेंद्रसिंग धोनीच्या पदार्पणाची आठवण करुन देत आहेत. धोनीने भारतासाठी टी-२० स्वरूपातील पहिला आंतरराष्ट्रीय सामना २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. या सामन्यात तो खाते न उघडता धावबाद झाला होता.
हेही वाचा – IND vs ZIM 1st T20 : निराशाजनक पराभवानंतर कर्णधार शुबमन गिल काय म्हणाला? कोणाला धरले जबाबदार? जाणून घ्या
पदार्पणात शून्यावर बाद होणारा अभिषेक चौथा भारतीय –
झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्मा खाते न उघडताच बाद झाला. अभिषेक शर्माचा हा डेब्यू सामना होता. अभिषेक शर्माने आऊट होताच एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला. हा विक्रम फक्त चार भारतीय खेळाडूंच्या नावावर आहे. त्यामुळे पदार्पणाच्या सामन्यात ० धावांवर बाद होणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी, टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी, केएल राहुल, पृथ्वी शॉ हे त्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पणात शून्यावर बाद झाले होते.
हेही वाचा – IND vs ZIM 1st T20 : भारतीय संघात तीन युवा खेळाडूंनी केले पदार्पण, शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली मिळाली संधी
टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पणात शून्यावर बाद होणारे भारतीय खेळाडू –
१. एमएस धोनी विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२००६)
२. केएल राहुल विरुद्ध झिम्बाब्वे (२०१६)
३. पृथ्वी शॉ विरुद्ध श्रीलंका (२०२१)
४. अभिषेक शर्मा विरुद्ध झिम्बाब्वे (२०२४)*