Abhishek Sharma Biggest T20I innings IND vs ENG: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २४७ धावांची मोठी धावसंख्या उभारली आहे. टीम इंडियासाठी अभिषेक शर्मा या सामन्यात स्टार खेळाडू ठरला. त्याने भारतासाठी दुसरे सर्वात जलद शतक झळकावले. यादरम्यान अभिषेक शर्माने अनेक मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत. याशिवाय त्याने असा विक्रम आपल्या नावे केला आहे, जो टीम इंडियासाठी यापूर्वी कोणीच केला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिषेक शर्माने डावाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केली. त्याने अवघ्या १७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर अभिषेकने अवघ्या ३७ चेंडूत आपले शतक पूर्ण करत दुसरे सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम केला. पॉवरप्लेमध्येच अभिषेकने ५८ धावा केल्या होत्या. तो टी-२० सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आणि त्याने यशस्वी जैस्वालचा विक्रम मोडला. यापूर्वी, जैस्वालने २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये ५३ धावा केल्या होत्या.

T20I सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज:

अभिषेक शर्मा- ५८ धावा
यशस्वी जैस्वाल- ५३ धावा
रोहित शर्मा- ५१ धावा
केएल राहुल- ५० धावा

भारतासाठी टी-२० मध्ये सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या

अभिषेक शर्माने इंग्लंडविरूद्ध पाचव्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ५४ चेंडूत १३५ धावा केल्या आहेत, ज्यात त्याने ७ चौकार आणि १३ षटकार लगावले आहेत. यासह, तो एका टी-२० सामन्यात भारतीय संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज बनला आहे आणि त्याने शुबमन गिलचा विक्रम मोडला आहे. गिलने २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १२६ धावांची इनिंग खेळली होती. आता अभिषेकने हा विक्रम मागे टाकला आहे.

T20I मध्ये भारतीय संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळणारे फलंदाज

अभिषेक शर्मा- १३५ धावा
शुभमन गिल – १२६ धावा
रुतुराज गायकवाड-१२३ धावा
विराट कोहली- १२२ धावा
रोहित शर्मा- १२१ धावा

अभिषेक शर्माने मोडला रोहित शर्माचा विक्रम

अभिषेक शर्माने १० षटकारांच्या मदतीने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात जलद शतक तर भारतासाठी दुसरे सर्वात जलद शतक झळकावले. यानंतर अभिषेकने १३५ धावांच्या खेळीत १३ षटकार लगावले. यापूर्वी रोहित शर्माने एका टी-२० डावात सर्वाधिक १० षटकार लगावले होते. रोहित शर्मानंतर कोणत्यात खेळाडूला ही कामगिरी करता आली नव्हती. आता अभिषेक शर्माने रोहितचा हा विक्रम मोडित काढला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek sharma highest t20i score for india 135 runs breaks many records ind vs eng 5th t20i bdg