Abhishek Sharma insta story viral : टीम इंडियाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मासोबत दिल्ली विमानतळावर गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली विमानतळावर डावखुऱ्या भारतीय सलामीवीराचे जे काही झाले, ते त्याने स्वत: सोशल मीडियावर सांगितले आहे. अभिषेक शर्माच्या म्हणण्यानुसार, ही घटना इंडिगो आणि तेथील कर्मचाऱ्यांच्या वागण्याशी संबंधित आहे. त्याची अवस्था सांगताना त्याने काउंटर मॅनेजरची तक्रार केली आहे. यापूर्वी कधीही इतका वाईट अनुभव आला नसल्याचे अभिषेकने सांगितले. त्याच्या मते, यापेक्षा वाईट काही असू शकत नाही.
दिल्ली विमानतळावर अभिषेक शर्मासोबत काय घडलं?
भारताचा डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्मा विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पंजाब संघाचा सदस्य होता. मात्र, पंजाब संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर तो घरी परतत होता. या वेळी दिल्ली विमानतळावर इंडिगोच्या स्टाफने त्याच्याशी गैरवर्तन केले. याबाबत त्याने इन्स्टावर स्टोरी पोस्ट करत आपला संताप व्यक्त केला. त्याने कसा आणि किती मनस्ताप सहन करावा लागला? ते इन्स्टा स्टोरीत नमूद केले.

अनावश्यकपणे मला दुसऱ्या काउंटरवर पाठवले –
अभिषेक शर्माने इन्स्टा स्टोरीत लिहले की, “मला दिल्ली विमानतळावर इंडिगोचा आणि त्यांच्या स्टाफचा सर्वात वाईट अनुभव आला. विशेषत: काउंटर मॅनेजर सुष्मिता मित्तल यांचे वर्तन पूर्णपणे अस्वीकार्य होते. मी वेळेवर योग्य काउंटरवर पोहोचलो होतो, परंतु त्यांनी अनावश्यकपणे मला दुसऱ्या काउंटरवर पाठवले. त्यानंतर मला सांगितले की चेक-इन बंद झाले आहे.”
कोणत्याही एअरलाइन्समधील सर्वात वाईट अनुभव –
अभिषेक शर्माने पुढे लिहले, “ज्यामुळे माझी फ्लाइट मिस झाली. त्यामुळे माझ्याकडे असलेली फक्त एका दिवसाची सुट्टी पण ती पूर्णपणे वाया गेली. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्यांनी पुढे मला कोणतीही मदत केली नाही. हा आतापर्यंतचा कोणत्याही एअरलाइन्समधील सर्वात वाईट अनुभव आहे. त्याचबरोबर मी पाहिलेले सर्वात वाईट कर्मचारी व्यवस्थापन आहे.”
हेही वाचा – Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी अभिषेक शर्माची निवड –
अभिषेक शर्माची नुकतीच इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघात निवड झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो संजू सॅमसनसोबत भारतीय डावाची सुरुवात करताना दिसणार आहे, अशी अपेक्षा आहे. अभिषेक शर्माचा सध्याचा फॉर्म उत्कृष्ट आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये धावा केल्या आहेत. या दोन्ही देशांतर्गत स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल १० फलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्धही अभिषेक शर्मा हाच फॉर्म कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे.