वेस्ट इंडिजमध्ये २००७ साली झालेल्या विश्वचषकात केलेल्या हॅट्ट्रिकची पुनरावृत्ती करण्याची क्षमता माझ्यात असल्याचा दावा श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगा याने केला आहे.

‘‘मला पुन्हा हॅट्ट्रिक मिळवणे का शक्य नाही? मी तशाच हॅट्ट्रिकसाठी नक्कीच प्रयत्न करीन आणि तसे घडल्यास ती नक्कीच विशेष असेल,’’ असे मलिंगाने माध्यमांशी बोलताना सांगितले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मलिंगाला सनथ जयसूर्याला (३२३ बळी) मागे टाकण्यासाठी फक्त एका बळीची आवश्यकता आहे. तसे झाल्यास तो जगातील अव्वल १० गोलंदाजांच्या मांदियाळीत स्थान मिळवेल.

इंग्लंडमधील वातावरण गोलंदाजांसाठी नेहमीच आल्हाददायी असल्याचे मलिंगाने सांगितले. ‘‘इंग्लंडमध्ये गोलंदाजी करताना तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या वातावरणात गोलंदाजी करण्याची संधी मिळते. कधी उष्ण वातावरणात तर काही वेळेस थंड वातावरणात गोलंदाजी करावी लागते. त्यामुळे गोलंदाजांना त्यांच्यातील विशेष क्षमतांच्या खऱ्या कसोटीला सामोरे जावे लागते,’’ असेही मलिंगाने नमूद केले.