‘‘संसदेतील माझ्या अनुपस्थितीची मोठय़ा प्रमाणावर चर्चा होते आहे. संसदेसारख्या संस्थेचा अपमान करण्याचा मी विचारही करू शकत नाही. माझ्या कुटुंबातील आजारपणामुळे मला दिल्लीपासून दूर राहावे लागले,’’ अशी प्रतिक्रिया सचिन तेंडुलकरने व्यक्त केली.
‘‘माझ्या कुटुंबातील सदस्याच्या आजारपणामुळे मला दिल्लीत हजेरी लावता आली नाही, ही गोष्ट खाजगीच राहावी अशी माझी इच्छा होती. माझा भाऊ अजितवर बायपास शस्त्रक्रिया झाली. त्यावेळी त्याच्यासोबत राहणे हे माझे कर्तव्य होते, त्यामुळे संसदेत मी हजर राहू शकलो नाही,’’ असे सचिनने पुढे सांगितले.
राष्ट्रकुलमधील ६४ पदक विजेत्या खेळाडूंचा यावेळी सचिनच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमानंतर सचिनने प्रसार माध्यमांशी संवाद साधला. संसदेतील मोठय़ा प्रमाणावरील अनुपस्थिबाबत सचिन व ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्यावर शुक्रवारी राज्यसभेत टीका झाली. याबाबत स्पष्टीकरण देताना सचिन म्हणाला, ‘‘तुमच्यावर टीका करणाऱ्यांची संख्या खूप असते, पण जोपर्यंत तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहात, तोपर्यंत तुम्हाला चिंता करण्याचे काहीच कारण नसते. क्रीडापटूंचे आयुष्य चढ-उतारांचे असते. जय-पराजयाला शांतपणे सामोरे जाणे आवश्यक असते. निर्णय काय, यापेक्षाही ध्येयाविषयी शंभर टक्के प्रयत्न करणे हे आपले काम आहे.’’
भारताच्या २३१ खेळाडूंचे पथक या कार्यक्रमाला हजर होते. सुवर्णपदक विजेत्याला २० लाख, रौप्यपदक विजेत्याला १० लाख व कांस्यपदक विजेत्याला ६ लाख रुपयाचे इनाम यावेळी देण्यात आले.
भावाच्या आजारपणामुळे संसदेत हजर राहू शकलो नाही -सचिन
‘‘संसदेतील माझ्या अनुपस्थितीची मोठय़ा प्रमाणावर चर्चा होते आहे. संसदेसारख्या संस्थेचा अपमान करण्याचा मी विचारही करू शकत नाही.
First published on: 09-08-2014 at 02:45 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Absence of sachin tendulkar in rajya sabha