Abu Azmi on Aurangzeb : समाजवादी पार्टीचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ सुरू झाला आहे. आझमी यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद रंगण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आज त्याचे विधानसभेत पडसाद उमटले. आज (४ मार्च) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आमदारांनी अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून सभागृहात गोंधळ घातला. परिणामी विधीमंडळाचं आजचं कामकाज तहकूब करण्यात आलं. काल विधिमंडळाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अबू आझमी यांनी ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’ असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. आज भाजपा व शिवसेना (शिंदे) आमदारांनी विधानसभेत या वक्तव्यावरून गोंधळ घातला. अबू आझमी यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, अबू आझमी यांनी त्यांच्यावर झालेली टीका आणि आज विधानसभेत सत्ताधारी आमदारांनी व्यक्त केलेल्या संतप्त प्रतिक्रिया पाहून मवाळ भूमिका घेतली आहे. तसेच त्यांनी त्यांचं वक्तव्य मागे घेतलं आहे. आझमी यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “माझ्या वक्तव्याची मोड-तोड करून ते सादर करण्यात आलं आहे. औरंगजेब रहमतुल्लाह अलेह यांच्याबद्दल मी तेच वक्तव्य केलं जे इतिहासकारांनी व लेखकांनी आपल्यासमोर मांडलं आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा अन्य कुठल्याही महापुरुषाबद्दल कोणत्याही प्रकारचं अपमानजनक वक्तव्य केलं नाही. तरीदेखील माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द व संपूर्ण वक्तव्य मागे घेतो. माझं वक्तव्य एक राजकीय मुद्दा बनलं आहे. माझ्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अधिवेशन तहकूब होणं महाराष्ट्राच्या जनतेसाठी चांगली गोष्ट नाही. त्यामुळे जनतेचं नुकसान होतंय.”

सपा आमदार अबू आझमी नेमकं काय म्हणाले?

अबू आझमी म्हणाले, “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी कोणाचाही अपमान केलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज या सर्व महान पुरुषांचा मी आदर करतो. सर्वांनी त्यांचा आदर करायला हवा, यांना आदर्श मानून वाटचाल करायला हवी. मी औरंगजेबाबद्दल जे वक्तव्य केलं ते इतिहासकारांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर केलं होतं. परंतु, त्या वक्तव्यामुळे विधानसभेचं कामकाज तहकूब व्हायला नको होतं. विधीमंडळात आपल्याला खूप कामं करायची आहेत. जनतेची कामं प्रलंबित आहेत. विधीमंडळाचं कामकाज सुरळीत व्हावं यासाठी मी माझं वक्तव्य मागे घेतो.