Asia Cup 2022 Schedule: येत्या २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीमध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे. या संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रक समोर येताच भारतीय क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. या वेळापत्रकानुसार २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान एकमेकांशी भिडतील. हा सामना दुबई येथे होणार आहे.

“प्रतीक्षा अखेर संपली आहे. कारण आशियातील क्रिकेट वर्चस्वाची लढाई २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या काळात होईल. आशिया चषकाची १५वी आवृत्ती ही आयसीसी टी २० विश्वचषकापूर्वीची सर्वात आदर्श रंगीत तालीम ठरेल”, असे ट्विट भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी केले आहे. जय शाह हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत.

आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकाच गटामध्ये आहेत. दोघांचा पहिला सामना २८ ऑगस्ट रोजी होणार आहे. ग्रुप स्टेजच्या सामन्यांनंतर ‘सुपर फोर’ टप्पा असेल आणि सर्वोत्तम दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील.

हेही वाचा – IND vs WI 3rd T20 Playing 11: तिसऱ्या सामन्याचीही बदलली वेळ! जाणून घ्या सुधारित वेळ आणि संभाव्य संघ

आशिया चषकाचे आयोजन श्रीलंकेत केले जाणार होते. मात्र, तेथील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थिती बघता आशिया चषक श्रीलंकेतून यूएईमध्ये हलवण्यात आला. हा निर्णय घेताना आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह म्हणाले होते, “श्रीलंकेतील प्रचलित परिस्थिती लक्षात घेता, एसीसीने व्यापक विचारानंतर एकमताने ठिकाण बदलण्याचा निष्कर्ष काढला आहे. स्पर्धा जरी श्रीलंकेत होणार नसली तरी, लंकेकडे यजमान पदाचे सर्व अधिकार असतील.”

Story img Loader