भारत आणि पाकिस्तानचे वैर जगविख्यात आहे. अगदी क्रिकेटच्या मैदानातही हे वैर बघायला मिळते. दोन्ही देशांदरम्यानच्या सामन्यात मैदानावर खेळाडू आणि मैदानाबाहेर चाहते एकमेकांना खुन्नस देताना दिसतात. मात्र, लवकरच जगभरातील क्रिकेट चाहत्यांना एक अत्यंत दुर्मिळ दृश्य बघायला मिळू शकते. ज्यामध्ये भारतीय क्रिकेटमधील आणि पाकिस्तान क्रिकेटमधील काही अव्वल खेळाडू एकाच संघात खेळताना दिसतील. आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) आफ्रो-आशियाई चषक पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. हा चषक २००७मध्ये शेवटचा खेळवला गेला होता. आता पुन्हा पुढील वर्षी म्हणजेच २०२३मध्ये हा चषक खेळवला जाण्याचा विचार एसीसी करत आहे.
एसीसीची ही योजना जर यशस्वी झाली तर विराट कोहली, बाबर आझम, रोहित शर्मा, मोहम्मद रिझवान यांसारखे खेळाडू एकाच संघाकडून खेळताना दिसतील. आफ्रो-आशियाई चषक २००५ आणि २००७ मध्ये आयोजित करण्यात आला होता. पहिल्या वर्षी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली गेली होती. तर, दुसऱ्या वर्षी या स्पर्धेत एक टी-२० सामनाही जोडला गेला होता. हाच चषक पुन्हा सुरू करण्यासाठी एसीसी प्रयत्नशील आहे. त्यात एसीसीला यश आले तर भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशचे खेळाडू एकत्र खेळताना दिसतील.
हेही वाचा – सचिनसाठी अर्जुन झाला स्वयंपाकी! ‘फादर्स डे’निमित्त दिली खास भेट
भारत आणि पाकिस्तानसाठी ही सर्वात मोठी घटना असणार आहे. या दोन्ही देशांनी २०१२मध्ये शेवटचे द्विपक्षीय स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर दोन्ही देशांमधील वाढत्या राजकीय तणावामुळे द्विपक्षीय मालिका खेळणे थांबवले आहे. आता फक्त एकदिवसीय विश्वचषक, चॅम्पियन्स चषक, टी २० विश्वचषक आणि आशिया चषकासारख्या आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात.
एसीसीचे कमर्शियल आणि इव्हेंट्सचे प्रमुख प्रभाकरन थनराज यांनी फोर्ब्सला सांगितले की, “आम्हाला अद्याप क्रिकेट बोर्डांकडून परवानगी मिळणे बाकी आहे. आम्ही बीसीसीआय आणि पीसीबी या दोन्ही क्रिकेट बोर्डांना आमची योजना सादर करण्याचा विचार करत आहोत.” ते पुढे म्हणाले, “आशियाई इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमधील सर्वोत्तम खेळाडू घेण्याची आमची योजना आहे. योजनांना अंतिम टप्प्यात आल्यानंतर आम्ही प्रायोजकत्व आणि प्रसारकांसाठी प्रयत्न करणार आहोत.”