Former Cricketer Akash Chopra’s Reaction to India’s Defeat : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडिया टार्गेटवर आहे. माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रानेही पहिल्या कसोटीतील टीम इंडियाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आकाश चोप्राचे मत आहे की, भारताने जसा खेळ करणे आवश्यक होते, तसे खेळले नाही. आकाशने सांगितले की, खेळपट्टीकडून होत असलेल्या मदतीचा फायदा घेण्यात भारतीय गोलंदाजही अपयशी ठरले.
पहिल्या कसोटीत केएल राहुलच्या शानदार शतकामुळे टीम इंडियाने पहिल्या डावात २४५ धावा केल्या होत्या. पण शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णाच्या खराब गोलंदाजीने त्यावर पाणी फेरले. या दोघांनी ३९ षटकात १९४ धावा दिल्या आणि केवळ दोन विकेट घेण्यात यश आले. यामुळे आफ्रिकेने ४०८ धावांची मोठी धावसंख्या उभारली आणि पहिल्या डावात १६३ धावांची आघाडी घेतली. भारताने दुसऱ्या डावात केवळ १३१ धावा केल्या आणि एक डाव आणि ३२ धावांनी सामना गमावला.
भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा, जिओ सिनेमाचा दैनिक स्पोर्ट्स शो ‘हॅशटॅग आकाशवाणी’ होस्ट करत असताना, भारताच्या कामगिरीचे आणि सेंच्युरियनमध्ये त्यांच्या पडझडीला कारणीभूत घटकांचे विश्लेषण केले. आकाश चोप्रा म्हणाला, ‘तिसऱ्या दिवशी भारताकडून सामन्यात पुनरागमन अपेक्षित होते. परंतु, तसे झाले नाही. डावाने झालेला पराभव अतिशय लाजिरवाणा आहे. पहिल्या डावात केएल राहुलने चांगली फलंदाजी केली आणि दुसऱ्या डावात विराट कोहली लढताना दिसला. याशिवाय एकाही फलंदाजाने क्रीजवर उभे राहण्याचे धाडस दाखवले नाही.’
हेही वाचा – AUS vs PAK : मिचेल स्टार्कने छोट्या चाहत्याला दिलेला शब्द पाळत जिंकली सर्वांची मनं, पाहा VIDEO
मालिकेत बरोबरीची संधी –
आकाश चोप्रा पुढे म्हणाला, ‘अश्विन निष्प्रभ ठरला. शार्दुल आणि प्रसिध यांनी पहिल्या कसोटीत अत्यंत खराब कामगिरी केली. विश्वचषकानंतर शार्दुलने एकही सामना खेळला नव्हता. भारताचे गोलंदाजी आक्रमण अतिशय सामान्य राहीले. याचा परिणाम म्हणून टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.’ सध्या टीम इंडिया दोन सामन्यांच्या मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. भारताला मालिकेत बरोबरी साधण्याची संधी आहे. उभय संघांमधील दुसरा कसोटी सामना ३ जानेवारीपासून खेळवला जाणार आहे.