पीटीआय, नवी दिल्ली
इतरांपेक्षा स्वत:च्याच अपेक्षांचे मला दडपण जाणवू लागले होते. याचा माझ्या खेळावर परिणाम होऊ लागला. त्यामुळे दडपण झुगारणे सर्वांत महत्त्वाचे असल्याचे मी स्वत:ला सांगितले. अंतिम निकालापेक्षा केवळ प्रक्रियेवर आणि सर्वोत्तम खेळ करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा मी निर्णय घेतला. त्यामुळेच मला सातत्याने यश मिळू लागले, असे मनोगत बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णकमाई करणाऱ्या पुरुष संघातील सदस्य अर्जुन एरिगेसीने व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एरिगेसीने यंदाच्या वर्षात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ऑलिम्पियाडमध्ये पुरुष संघाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावतानाच त्याने ११ पैकी ९ लढती जिंकत तिसऱ्या पटावर वैयक्तिक सुवर्णपदकही पटकावले. या दमदार कामगिरीच्या आधारे आता तो जागतिक क्रमवारीत कारकीर्दीतील सर्वोत्तम तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. मात्र, वर्षभरापूर्वी तो निराशेच्या गर्तेत अडकला होता आणि मोठ्या जिद्दीने यातून बाहेर पडला.

‘‘२०२१ मध्ये माझ्या प्रतिभेनुरूप माझी क्रमवारी नव्हती. माझे २६०० हून अधिक एलो गुण पाहिजे होते. मात्र, त्या वेळी मी २५०० गुणांवर होतो. २०२३ मध्ये मी २७०० गुणांपर्यंत मजल मारली आणि त्यानंतर माझ्यासाठी कठीण काळ सुरू झाला. मला बऱ्याच चढ-उतारांना सामोरे जावे लागत होते. विशेषत: ‘कँडिडेट्स’साठी पात्र न ठरू शकल्याने मी खूप निराश झालो. त्यामुळे २०२३ हे वर्ष माझ्यासाठी खरेच खूप अवघड गेले,’’ असे एरिगेसीने सांगितले.

‘‘मी स्वत:समोर काही लक्ष्य ठेवायचो आणि ते गाठू न शकल्यास खूप निराश व्हायचो. मला स्वत:कडूनच फार अपेक्षा होत्या. मात्र, एक वेळ अशी आली, जेव्हा आपण निकालांबाबत विचार करायचा नाही असे मी ठरवले. केवळ सर्वोत्तम खेळ करायचा आणि त्यानंतर जे होईल, ते स्वीकारायचे असे मनाशी पक्के केले. माझ्यासाठी हा बदल सोपा नव्हता. मात्र, कालांतराने मला याचा फायदा मिळण्यास सुरुवात झाली. केवळ सर्वोत्तम कामगिरीचा विचार केल्यास आपल्याला हवा तो निकाल मिळण्याची शक्यता वाढते,’’ असे एरिगेसी म्हणाला.

भारताची सुवर्णपिढी

एरिगेसी, डी. गुकेश आणि आर. प्रज्ञानंद या युवकांनी बुद्धिबळविश्वात आपले नाणे खणखणीत वाजवले आहे. क्रमवारीनुसार एरिगेसी भारताचा अव्वल बुद्धिबळपटू आहे. गुकेश याच वर्षी जगज्जेतेपदाच्या लढतीत खेळणार आहे, तर प्रज्ञानंद गेल्या वर्षीच्या विश्वचषक स्पर्धेतील उपविजेता आहे. ‘‘आपण आमच्या पिढीला बुद्धिबळातील भारताची ‘सुवर्णपिढी’ नक्कीच म्हणू शकतो. मी या सगळ्यांमध्ये सर्वांत मोठा आहे. आम्ही एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतो आणि आमच्यात चांगली स्पर्धाही आहे. जेव्हा आमच्यापैकी एक जण मोठे यश मिळवतो, तेव्हा इतरांना त्याचे अनुकरण करण्याची किंवा त्याहूनही दर्जेदार कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. भारतीय बुद्धिबळासाठी ही नक्कीच चांगली गोष्ट आहे,’’ असे एरिगेसी म्हणाला.