Brian Lara Says Virat Kohli cannot break Sachin Tendulkar’s record of 100 centuries : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला एकदा शतक झळकावण्यासाठी जवळपास तीन वर्ष संघर्ष करावा लागला होता. परंतु जेव्हापासून त्याने पुनरागमन केले आहे, तेव्हापासून त्याच्या शतकांचा वेग आणि आकडाही वाढला आहे. अलीकडेच त्याने सचिन तेंडुलकरचा वनडेमध्ये ४९ शतकांचा विक्रम मोडला आहे. तसेच विराट एकदिवस सचिनचा १०० शतकांचा विक्रम मोडेल, अशी चाहत्यांना आशा आहे. त्याचबरोबर बऱ्याच माजी क्रिकेटपटूंनाही वाटते विराट सचिनचा महाशतकाचा विक्रम मोडू शकतो. मात्र, वेस्ट इंडिजचा महान खेळाडू ब्रायन लाराचे याबाबत वेगळे मत आहे. त्यांच्या मते विराटला सचिनचा विक्रम मोडता येणार नाही.
विराट कोहलीसाठी २० शतके करणे कठीण –
विराट कोहलीने आतापर्यंत ८० शतके केली आहेत. सचिनची बरोबरी करण्यासाठी त्याला आणखी २० शतके झळकावायची आहेत. लारा यांच्या म्हणण्यानुसार वयाच्या ३५ व्या वर्षी हे काम करणे सोपे नाही. एबीपी न्यूजशी बोलताना लारा म्हणाले, ” विराट कोहली आता ३५ वर्षांचा झाला आहे. सध्या त्याच्या नावावर एकूण ८० शतके आहेत. सचिनचा १०० शतकांचा विक्रम मोडण्यासाठी त्याला अजून २० शतके झळकावायची आहेत. त्याने जरी दरवर्षी पाच शतके केली, तरी १०० शतके झळकावण्यासाठी त्याला चार वर्षे लागतील. चार वर्षांनंतर कोहली ३९ वर्षांचा झाला असेल. त्या वयात हे काम खूप कठीण वाटते.”
क्रिकेटच्या लॉजिकनुसार हे काम अवघड –
ब्रायन लारा पुढे म्हणाले, ‘विराट कोहली १०० शतकांचा विक्रम मोडेल असे जे म्हणत आहेत, ते कदाचित क्रिकेटचे लॉजिक लक्षात घेत नाहीत. कारण २० शतके करणे सोपे नाही. अनेक क्रिकेटपटूंना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत इतकी शतके झळकावता येत नाहीत.” माजी खेळाडू पुढे म्हणाला, ”कोहली १०० शतकांचा विक्रम मोडेल, असे म्हणण्याचे धाडस माझ्यात नाही. वय कोणासाठी थांबत नाही. कोहली अजून अनेक विक्रम नक्कीच मोडेल, पण १०० शतके झळकावणे अवघड वाटते.
ब्रायन लारांकडून विराट कोहलीचे कौतुक –
ब्रायन लारा कोहलीचे कौतुक करतान म्हणाले की, ‘जर १०० शतकांच्या जवळ पोहोचणारा कोणी क्रिकेटर असेल, तर तो कोहली आहे.’ लारा हे कोहलीच्या शिस्तीचे आणि समर्पणाची मोठे चाहते आहेत. ते म्हणले कोहलीने हा विक्रम मोडला, तर त्यांना आनंद होईल. सचिन जरी आपला जवळचा मित्र असला, तरी ते कोहलीचे चाहते असल्याचे, ब्रायन लारा यांनी सांगितले.