Irfan Pathan Says New Zealand will be the fourth team in the semi-finals: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. तीन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. तिन्ही संघांमध्ये चौथ्या संघासाठी लढत सुरू आहे. उपांत्य फेरीत रोहित आणि कंपनीचा सामना या संघाशी होणार आहे. सध्या न्यूझीलंड आणि पाकिस्तानचे संघ चौथ्या स्थानासाठी प्रबळ दावेदार दिसत आहेत. दरम्यान, भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने आपले मत मांडले आहे. त्याला न्यूझीलंड क्रिकेट संघाला उपांत्य फेरीत चौथा संघ म्हणून पाहायचे आहे.
स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमातील संवादादरम्यान इरफान पठाण म्हणाला, ‘न्यूझीलंडची जिंकण्याची शक्यता ५०% पेक्षा जास्त आहे. त्यांची पाऊस ही एकमेव समस्या आहे. याआधीही पावसाने पाकिस्तानला या स्पर्धेत मदत केली आहे. बंगळुरूमध्येही पाऊस त्यांना मदत करतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.’
एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या ४१व्या सामन्यात ९ नोव्हेंबरला न्यूझीलंडचा सामना श्रीलंका संघाशी होत आहे. हा सामना किवी संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. या सामन्यापूर्वी भारताच्या माजी अष्टपैलू खेळाडूने किवी संघाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पाहिजे, असे त्यांचे मत आहे.
इरफान पठाण पुढे म्हणाला, ‘माझ्या मते न्यूझीलंडसाठी नाणेफेक खूप महत्त्वाची असणार आहे. कारण या मैदानात पाठलाग नेहमीच चांगला झाला आहे. याचे अनेक फॅक्टर आहेत. असे असूनही, मी पुन्हा सांगू इच्छितो की, सर्व अडचणी असतानाही न्यूझीलंड उपांत्य फेरीतील चौथा संघ बनेल.’ तसेच न्यूझीलंड संघानेसुद्धा इरफान पठाणचे ऐकत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा करण्याचा निर्णय घेतला. कारण बंगळुरु येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर लक्ष्याचा पाठलाग करणे सोपे आहे.
हा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. पावसामुळे दोन्ही संघांचा खेळ खराब होईल. अशा स्थितीत सामना २० षटकांचा झाला, तरी या सामन्यात निकाल निश्चितच हवा, असे दोन्ही संघांना वाटते. न्यूझीलंडचे आठ गुण आणि नेट रन रेट +०.३९८ आहेत. पराभव किंवा पावसामुळे सामना रद्द झाल्यास तो स्पर्धेतून बाहेर पडेल, हे त्याला माहीत आहे. सध्या न्यूझीलंड गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचेही आठ गुण आहेत. पाकिस्तानचा नेट रन रेट ०.०३६ आहे, तर अफगाणिस्तानचा -०.३३८ आहे.