बदलत्या काळासह क्रिकेटच्या स्वरूपामध्ये अनेक बदल झाले. मात्र, आता बदलांमुळे क्रिकेटच्या मूळ स्वरूपांना धोका निर्माण झाला आहे. टी २० लीग क्रिकेटच्या उदय आणि विकासामुळे एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटचे अस्तित्व धोक्यात आल्याचे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी मांडले आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सिडनी येथे भारत-ऑस्ट्रेलिया ‘स्ट्रॅटेजिक अलायन्स डिनर’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भारताचे माजी कर्णधार कपिल देव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळ त्यांनी क्रिकेटची सद्यस्थिती आणि भविष्याबाबत आपले मत मांडले.

हेही वाचा – Legends League Cricket: लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेतील ‘खास’ सामन्यासाठी सौरव गांगुली घेणार नाही मानधन

कपिल देव यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्ड आणि द एजला सांगितले, “मला वाटते की एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट हळूहळू लुप्त होत आहे. सध्या क्रिकेटची स्थिती युरोपातील फुटबॉल लीगप्रमाणे झाली आहे. तिथे फुटबॉलच्या द्विराष्ट्रीय स्पर्धा होत नाहीत. चार वर्षांतून एकदाच विश्वचषक होतो. आयसीसीने वेळीच हस्तक्षेप केला नाही तर भविष्यात क्रिकेटही अशाच प्रकारे खेळले जाईल. एकदिवसीय क्रिकेट फक्त विश्वचषकापुरते मर्यादित राहील आणि इतरवेळी फक्त टी २० लीग क्रिकेट खेळले जाईल.”

क्रिकेटपटू मुख्यतः आयपीएल किंवा बिग बॅशसारखे लीग खेळणार आहेत का? असाही प्रश्नही कपिल देव यांनी उपस्थित केला. “अनेक क्रिकेटपटू फार लवकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आयसीसीला एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटचे अस्तित्व सुरक्षित करण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत”, असे देव म्हणाले.

Story img Loader