Luke Wright says Jofra Archer will not be part of the England squad: इंग्लंडचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. २०२३ च्या विश्वचषकासाठी त्याला इंग्लंड संघातून वगळण्यात आले आहे. दुखापतीनंतर आर्चर अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. इंग्लंडचे राष्ट्रीय संघाचे निवडकर्ता ल्यूक राइट यांनी सांगितले की, आर्चर २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही. मात्र, तरीही तो राखीव म्हणून भारतात जाणार आहे. एकदिवसीय विश्वचषक २०२३ हा ५ ऑक्टोबरपासून भारतात होणार आहे.
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, राईट आर्चरबद्दल म्हणाले, “इंग्लंड संघ आर्चरच्या पुनरागमनासाठी खूप उत्सुक आहे. पण त्याच्यासाठी काय योग्य आहे, हेही ध्यानात ठेवावे लागेल. तो जखमी होणे दुर्दैवी आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी आता वेळच उरलेला नाही. तो विश्वचषकाचा भाग होऊ शकणार नाही. त्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. भविष्याचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा लागेल. तो इंग्लंडसाठी मोठा खेळाडू आहे.”
आर्चरने मार्च २०२३ मध्ये इंग्लंडसाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्याने २१ सामने खेळताना वनडेत ४२ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान ४० धावांत ६ बळी घेणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आर्चरने १३ कसोटी सामन्यात ४२ विकेट्स घेतल्या आहेत. या फॉरमॅटच्या एका डावात ४५ धावांत ६ बळी घेणे ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. आर्चरने १५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १८ विकेट्स घेतल्या आहेत.
विशेष म्हणजे इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात ४ वनडे आणि ४ टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ३० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यासाठी इंग्लंडने नुकताच संघ जाहीर केला आहे. मात्र आर्चरला त्यात स्थान मिळालेले नाही. यानंतर ५ ऑक्टोबरपासून विश्वचषक २०२३ सुरू होईल. यामध्ये इंग्लंडचा पहिला सामना न्यूझीलंडशी असून तो अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे.