भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली अतिशय वाईट फॉर्मशी झगडत आहे. गेल्या काही काळापासून त्याला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे अनेक माजी खेळाडूंनी त्याच्यावर टीका सुरू केली आहे. अशातच आता पाकिस्तानच्या सलामीवीरानेही वाहत्या गंगेमध्ये हात धुण्याचे काम केले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा सलामीवीर इमाम-उल-हक याने रोहित शर्मा आणि विराट कोहलीची तुलना केली आहे.
इमामने पाकिस्तानी वाहिनी समा न्यूजवरील कार्यक्रमात भारताच्या आजी-माजी कर्णधारांची तुलना केली आहे. तो म्हणाला, “मला वाटते की, अल्लाहने रोहित शर्माला जे कौशल्य दिले आहे, ते विराट कोहलीमध्ये दिसत नाही. मी या दोघांची फलंदाजी बघितली आहे. रोहित रिप्लेमध्ये फलंदाजी करत असल्याचा भास होतो. त्याचे टायमिंग फारच अप्रतिम आहे. पॉइंटवर क्षेत्ररक्षण करत असताना त्याला बघून मला पहिल्यांदाच टायमिंगचा खरा अर्थ कळला. विराट कोहलीकडे तशी टायमिंग दिसत नाही.”
हेही वाचा – विराट कोहलीबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचे मोठे वक्तव्य; म्हणाला,”तो जोरदार…”
तो पुढे असेही म्हणाला, “रोहित असा खेळाडू आहे जो दोन सेकंदात खेळ बदलू शकतो. जेव्हा तो खेळपट्टीवर स्थिर होतो तेव्हा तो त्याच्या इच्छेनुसार फटकेबाजी करू शकतो. मलादेखील रोहितसारखी प्रभावी कामगिरी करायची आहे. जर मी पाकिस्तानसाठी असे क्रिकेट खेळलो तर मला खूप आनंद होईल.”
साधारण गेल्या दोन वर्षांपासून विराट कोहली धावांच्या दुष्काळाचा सामना करत आहे. त्याने २०१९ मध्ये शेवटचे शतक झळकावले होते. स्नायूंच्या दुखापतीमुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळता आले नव्हते. तर, याच सामन्यात रोहित शर्माने आपली स्फोटक शैली दाखवत नाबाद ७६ धावांची खेळी केली होती. रोहित आणि धवनने मिळून १११ धावांचे लक्ष्य पूर्ण करत भारताला १० गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.