Ishan and Shreyas may be dropped from BCCI’s central contract : श्रेयस अय्यर आणि इशान किशन हे दोन भारतीय खेळाडू सध्या बीसीसीआयच्या निशाण्यावर आहेत. दोन्ही खेळाडूंनी वेगवेगळ्या कारणांमुळे रणजी ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसत नाहीत. आगामी आयपीएल हंगामापूर्वी इशान त्याच्या तंत्रावर काम करत असल्याची माहिती आहे. त्याचवेळी अय्यर पाठीच्या किरकोळ दुखण्याने त्रास होत आहे. मात्र, बीसीसीआयचे उच्चपदस्थ अधिकारी या दोघांवर पूर्णपणे खूश नसल्याचे दिसून येत आहे.
बीसीसीआय अय्यर आणि किशन यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे दोघांनाही नव्या केंद्रीय कराराच्या यादीतून वगळले जाण्याची शक्यता आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, अय्यर आणि किशन या दोघांना २०२३-२४ हंगामासाठी केंद्रीय करारबद्ध खेळाडूंच्या यादीतून काढून टाकले जाईल. या निर्णयामागील एक कारण म्हणजे बोर्डाच्या आग्रहानंतरही त्याची देशांतर्गत क्रिकेटमधून अनुपस्थिती.
आगरकर यांनी अंतिम यादी तयार केली – अहवाल
वृत्तानुसार, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवडकर्त्यांनी २०२३-२४ हंगामासाठी केंद्रीय करारबद्ध खेळाडूंची यादी जवळजवळ फायनल केली आहे. बीसीसीआय लवकरच याची घोषणा करेल. बीसीसीआयने वारंवार विनंती करूनही, देशांतर्गत क्रिकेटपासून दूर राहणे दोन्ही खेळाडूंना महागात पडेल. २०२२-२३ च्या केंद्रीय करारामध्ये, इशान किशनला सी श्रेणीत, तर श्रेयस अय्यरला बी श्रेणीत ठेवण्यात आले होते. याअंतर्गत किशनला एक कोटी आणि अय्यरला तीन कोटी रुपये मिळतात.
इशान किशनचं काय झालं?
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर तो भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता, मात्र दौऱ्याच्या सुरुवातीला ब्रेक घेऊन परतला होता. तेव्हापासून तो लाइमलाइटपासून गायब आहे. किशन बडोद्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याबरोबर सराव करताना दिसला. तो हार्दिकसोबत जिममध्येही दिसला होता. बोर्डाने इशान किशनला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले होते, मात्र तो त्यापासून दूर राहिला.
हेही वाचा – VIDEO : विराटच्या नेतृत्वाखाली खेळायला आवडेल की बाबरच्या? पाकिस्तानच्या गोलंदाजाने दिले चकीत करणारे उत्तर
श्रेयस अय्यरने केली होती तक्रार –
खराब फॉर्ममुळे श्रेयस अय्यरला इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन सामन्यांतून वगळण्यात आले होते. त्याला रणजी खेळण्याचा सल्लाही दिला होता. मात्र पाठदुखीमुळे श्रेयस रणजीपासून दूर राहिला होता. आता बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने त्याच्या दुखापतीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयला लिहिलेल्या पत्रात एनसीएने श्रेयसला फिट घोषित केले आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे क्रीडा विज्ञान आणि औषध विभागाचे प्रमुख नितीन पटेल यांनी श्रेयसला कोणतीही नवीन दुखापत नसून तो तंदुरुस्त असल्याची पुष्टी केली आहे.