Yuvraj Singh on Sanju Samson : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ या स्पर्धेला १ जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला होता. त्यामुळे आता ज्या खेळाडूंचे संघ आयपीएल २०२४ मधून बाहेर पडले आहेत, ते खेळाडू लवकरच अमेरिकेला रवाना होतील, जिथे भारताचे सर्व लीग टप्प्यातील सामने खेळवले जाणार आहेत. दरम्यान, आता भारतीय क्रिकेट संघ पहिल्या सामन्यात मैदानात उतरल्यावर त्याचे प्लेईंग इलेव्हन कशी असू शकतात, याबाबतही अटकळ बांधली जात आहे. यावर माजी खेळाडू युवराज सिंगने आपली मत व्यक्त केले आहे.
आयसीसीने युवराज सिंगला बनवले ॲम्बेसेडर –
आयसीसीने युवराज सिंगची टी-२० विश्वचषकासाठी ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. आयसीसीशी संवाद साधताना युवराज सिंग म्हणाला की, “संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांच्यापैकी एका खेळाडूचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याबाबत चर्चा होत असेल, तर मला पंतला संघात पाहायला आवडेल. संजू आणि पंत दोघेही खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहेत, पण ऋषभ हा डावखुरा खेळाडू आहे आणि मला वाटते की त्याच्यात भारतासाठी सामने जिंकवून देण्याची भरपूर क्षमता आहे. पंतने यापूर्वीही अनेकदा असे केले आहे.”
बीसीसीआयने टी-२० विश्वचषकासाठी निवडलेल्या १५ भारतीय खेळाडूंमध्ये संजू सॅमसन आणि ऋषभ पंत या दोघांचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये एकाच व्यक्तीला संधी मिळणार हे सर्वांनाच माहीत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि आयपीएलमधील टीम इंडियाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याबद्दल बरीच चर्चा रंगली आहे. आयपीएलमधील त्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते, तर या स्पर्धेत तो बॅटने एकही अप्रतिम खेळी खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत त्याचा संघ आधीच आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्याचबरोबर २००७ मध्ये भारतीय संघाला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा स्टार खेळाडू युवराज सिंगने हार्दिक पंड्याबद्दलही प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा – विराट कोहलीच्या जीवाला धोका, RCBने सराव सत्र केले रद्द; दहशतवादी असल्याच्या संशयावरुन ४ जण अटकेत
हार्दिक पंड्याबद्दल युवराज सिंग काय म्हणाला?
युवराज सिंगने हार्दिक पांड्याबद्दल बोलताना स्पष्टपणे सांगितले की, “बीसीसीआयच्या निवड समितीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडूंनी कशी कामगिरी केली आहे हे पाहिले आणि नंतर आयपीएलचा फॉर्म पाहिला. त्यामुळे त्याची निवड फक्त आयपीएल फॉर्मवर झालेली नाही. जर तुम्ही फक्त आयपीएलचा फॉर्म बघितला तर हार्दिकने चांगली कामगिरी केलेली नाही. भारतासाठी त्याची मागील कामगिरी पाहता, त्याने भारतासाठी काय केले आहे, हे पाहता तो संघात आहे हे महत्त्वाचे आहे. मला वाटते की त्याची गोलंदाजी महत्त्वाची असणार आहे आणि त्याचा फिटनेसही महत्त्वाचा असेल.”
जैस्वालने रोहितसह सलामी दिली पाहिजे –
टीम इंडियामध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांची टी-२० विश्वचषकासाठी सलामीवीर म्हणून निवड झाली असली, तरी कोहली रोहितसोबत डावाची सुरुवात करेल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. रोहित आणि यशस्वी जैस्वाल यांनी डावाची सुरुवात करावी, तर विराट कोहलीने तिसऱ्या क्रमांकावर यावे, अशी युवराजची इच्छा आहे. तो म्हणाला की, मला वाटते की रोहित आणि जैस्वाल यांनी डावाची सुरुवात करावी. तो म्हणाला की त्याला डाव्या हाताचे आणि उजव्या हाताचे काही कॉम्बिनेशन बघायचे आहे. कारण या दोन्ही कॉम्बिनेशनला नेहमीच गोलंदाजी करणे कठीण असते.
हेही वाचा – KKR vs SRH Qualifier 1: अंपायरने आऊट न दिल्याने काव्या मारन संतापली, रिएक्शन होतेय व्हायरल
टीम इंडियाचा पहिला सामना ५ जूनला आयर्लंडविरुद्ध होणार –
यंदाचा टी-२० विश्वचषक १ जूनपासून सुरू होणार असला तरी टीम इंडियाचा पहिला सामना ५ जूनला आयर्लंडशी होणार आहे. ९ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक शानदार सामनाही होणार आहे. टीम इंडियाच्या गटात पाकिस्तान आणि आयर्लंडशिवाय अमेरिका आणि कॅनडाचाही समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघ या सर्वांशी भिडताना दिसणार आहे. जर भारताने आपल्या गटातील शीर्ष २ मध्ये स्थान मिळवले तर संघ थेट सुपर ८ मध्ये जाईल, जिथे तो इतर गटातील शीर्ष संघांशी स्पर्धा करेल.