Zaheer Khan’s reaction to Shreyas Iyer : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले. यानंतर भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान नाराज झाला आहे. श्रेयसने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात चांगली कामगिरी केली होती, पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा फॉर्म समाधानकारक राहिला नाही. यावर झहीर म्हणाला की, श्रेयसला इंग्लंडच्या फिरकीपटूंविरुद्ध चांगला खेळ करून मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती, पण त्याने आपला फॉर्म परत मिळवण्याची चांगली संधी गमावली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

झहीरने श्रेयसला दिला सल्ला –

झहीर खान म्हणाला, “तुम्हाला ते क्षण समजून घेणे आवश्यक आहे, जे तुमच्यासाठी आणि संघासाठी महत्त्वाचे आहेत. मला वाटते की श्रेयस अय्यरसाठीही हाच क्षण होता. अँडरसनने आपला स्पेल पूर्ण केला होता. एकच वेगवान गोलंदाज उरला होता आणि त्यानंतर फिरकीचा वापर होत होता. तुमच्याकडे फिरकी खेळण्याची उच्च पातळीची क्षमता आहे. त्यामुळे तुम्ही एक संधी वाया घालवली. अधिक वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करताना तुम्ही तुमची विकेट गमावता. सध्या ज्या प्रकारची स्पर्धा आहे, त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते.”

डिसेंबर २०२२ नंतर एकही अर्धशतक नाही –

श्रेयसने डिसेंबर २०२२ पासून कसोटीत एकही अर्धशतक झळकावलेले नाही. त्यामुळे झहीरचा असा विश्वास आहे की, जर त्याने चांगली कामगिरी केली नाही, तर त्याला केएल राहुल आणि विराट कोहलीसाठी जागा खाली करावी लागू शकते. झहीर म्हणाला, “निवडकर्ते पुढील काही दिवसांत उर्वरित तीन कसोटींसाठी संघ जाहीर करू शकतात. केएल राहुल आणि विराट कोहली परत येऊ शकतात. त्यामुळे जर तुमच्याकडे दोन खेळाडू येत असतील तर दोन खेळाडू प्लेइंग इलेव्हनमधूनही बाहेर होतील. कारण येणारे जे खेळाडू आहेत, ते थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवतील.”

हेही वाचा – IND vs ENG : जसप्रीत बुमराहसमोर बेन स्टोक्स वारंवार का अपयशी ठरतोय? इंग्लंडच्या माजी कर्णधाराने सांगितले कारण

श्रेयस अय्यरची कसोटी कारकीर्द –

आतापर्यंत श्रेयसने १४ कसोटी सामन्यांच्या २४ डावांमध्ये ३६.८६ च्या सरासरीने ८११ धावा केल्या आहेत. या काळात त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेशविरुद्ध त्याचा ५० हून अधिक धावा केला होता. त्यानंतर ढाकामध्ये त्याने ८७ धावांची खेळी खेळली. त्यानंतर त्याने १३ डाव खेळले असून केवळ २१६ धावा केल्या आहेत. गेल्या १३ डावातील त्याची सर्वोच्च धावसंख्या ३५ धावा आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According zaheer khan shreyas had an opportunity to play well against englands spinners but he missed a good chance vbm