ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंदर सिंग अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल, असा इशारा केंद्रीय क्रीडामंत्री जितेंद्र सिंग यांनी सोमवारी दिला.
‘‘सध्या पंजाब पोलिसांकडून या प्रकरणी कसून चौकशी सुरू आहे. जेव्हा यासंदर्भातील निष्कर्ष बाहेर येईल आणि आरोपपत्र दाखल केले जाईल. त्यावेळी आम्ही निश्चितपणे कारवाई करू,’’ असे जितेंद्र सिंग यांनी सांगितले.
‘‘दोषी व्यक्तीला शिक्षा केली जाईल, पण ते पंजाब पोलिसांच्या अखत्यारित असेल. कारण तेच याविषयी चौकशी करीत आहेत,’’ असे ते पुढे म्हणाले.
अंमली पदार्थाचे सेवन करीत असल्याची कबुली देणाऱ्या राम सिंगची राष्ट्रीय क्रीडा संस्था (एनआयएस) आधीच हकालपट्टी करण्यात आली आहे. विजेंदरसोबत आपण अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे माजी राष्ट्रीय विजेत्या राम सिंगने कबूल केले आहे. परंतु विजेंदरने या आरोपांचा इन्कार केला आहे.

Story img Loader