भारताने आज ऑस्ट्रेलियासोबतच्या सामन्यात विजय मिळवला. भारताने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या नाकीनऊ आणत धावसंख्येचा आलेख सर्वबाद १८८ धावांवर रोखला. भारताला पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी १८९ धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. पण भारताच्या फलंदाजांनी सावध खेळी करत कांगारुंची दमछाक केली आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या सामन्यात दणदणीत विजयाची नोंद केली. आता या विजयामागे रजनीकांत अँगल आहे असं बोललं जात आहे. कारण हा सामना बघण्यासाठी सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत हे वानखेडे मैदानात उपस्थित होते. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता अजय देवगणही मैदानात होता. पण चर्चा होते आहे ती रजनीकांत यांचीच.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रजनीकांत यांच्या नावाची चर्चा का होते आहे?

भारताला विजयासाठी १८९ धावांची गरज होती. भारताने सुरूवातीला क्षेत्ररक्षण घेऊन नंतर फलंदाजी केली. त्यामुळे हे टार्गेट चेस करणं भारताला सोपं जाईल असं वाटलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करत असताना टीम इंडियाला सुरूवातीलाच तीन मोठे धक्के बसले. ज्यामुळे भारताची अवस्था ३ बाद १६ अशी झाली होती. यानंतर खेळपट्टीवर सेट झालेला शुभमन गिलही बाद झाला. गिल बाद झाला आणि वानखेडे मैदानात असलेल्या भारतीय चाहत्यांनी विजयाची आशा सोडली.

शुभमनच्या पाठोपाठ हार्दिक पंड्याही बाद झाला आणि भारतीय चाहत्यांची निराशा वाढली. अशावेळी भारतीय चाहत्यांना एकच आशा होती ज्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे ती म्हणजे रजनीकांत यांची. रजनीकांत मैदानात असतात तेव्हा भारत सामना जिंकतो कारण यापूर्वीच्याही एका सामन्यात ते मैदानात असताना भारताने मॅच जिंकली होती. आजही अगदी तसंच झालं.

भारताचे टॉप ऑर्डरचे फलंदाज इशान किशन, शुबमन गिल,विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद झाले. पण पण कर्णधार हार्दिक पांड्या आणि के एल राहुलने टीम इंडियाची पुढची फळी सांभाळली. परंतु, स्टॉयनीसच्या गोलंदाजीवर पांड्या बाद झाला आणि भारताला पुन्हा मोठा धक्का बसला. अशा परिस्थितीत के एल राहुलने सावध खेळी करून भारताला विजयाच्या दिशेनं खेचून नेलं. राहुलने ९१ चेंडूत नाबाद ७५ धावांची खेळी साकारली. तर रविंद्र जडेजाने ६९ चेंडूत ४५ धावांची नाबाद खेळी केली. दोघांनी रचलेल्या शतकी भागिदारीमुळं भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला. आता हे सगळं घडलं असलं तरीही रजनीकांत मैदानात होते त्यामुळेच भारताने हा सामना जिंकला अशी चर्चा सोशल मीडियावर होते आहे.

२०११ मध्ये रजनीकांत मैदानात असताना काय झालं होतं?

रजनीकांत २०११ ला वानखेडे स्टेडियमवर सामना बघण्यासाठी गेले होते. हा सामना वर्ल्डकपचा होता. भारताची त्यावेळीही बिकट अवस्था झाली होती कारण भारताचे ओपनिंग बॅट्समन सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग लवकर बाद झाले होते. मात्र रजनीकांत मैदानात होते. हा सामना भारताने जिंकला होता. त्यामुळे रजनीकांत टीम इंडियासाठी लकी आहेत अशी चर्चा होते आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor rajinikanth is lucky for india he came to the match before and witnessed the victory of team india scj