सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान हे आपल्या संगीतबद्ध केलेल्या गाण्यांसाठी कायम चर्चेत असतात. त्याच्या अविस्मरणीय संगीतामुळे त्यांनी रसिकांच्या मनात आपले एक अढळ स्थान निर्माण केले आहे. तर अभिनेता शाहरुख हा तर बॉलिवूडचा किंग आहेच. त्याच्या अभिनयामुळे त्याने प्रसिद्धीची एक वेगळीच उंची गाठली आहे.  कलाविश्वातील या दोन लोकप्रिय व्यक्ती एकत्र आल्या आहेत ते ‘जय हिंद, जय इंडिया’ म्हणण्यासाठी…

भारतात २८ नोव्हेंबरपासून हॉकी विश्वचषक स्पर्धा सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी ए. आर. रहमान यांनी ‘जय हिंद’ हे थीम सॉंग संगीतबद्ध केले आहे. Hockey World Cup anthem असलेल्या या गाण्यात अभिनेता शाहरुख खान आणि रहमान दोघेही ‘जय हिंद, जय इंडिया’ म्हणताना दिसत आहेत. रहमान यांनी या गाण्याचा प्रोमो ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख आणि रहमान हे हाती हॉकी स्टिक घेऊन हे गाणं गाताना दिसत आहेत.

दरम्यान, Hockey World Cup २०१८ या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमच्या मैदानावर सर्व सामने खेळवले जाणार आहेत. १६ संघ ४ गटात विभागण्यात आले आहेत. बेल्जीयम, कॅनडा आणि दक्षिण आफ्रिका यांच्यासह क गटात भारताचा समावेश करण्यात आला आहे. २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत हि स्पर्धा होणार आहे.

Story img Loader