Adam Gilchrist on Jasprit Bumrah : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह क्रिकेटच्या मैदानापासून काही दिवस दूर आहे. मात्र, या मालिकेत त्याने शानदार कामगिरी करत अनेक विक्रमाला गवसणी घातली. ज्यामुळे त्याच्यावर आजी-माजी क्रिकेपटूंकडून कौतुकाचा वर्षाव झाला. आता आस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टने बुमराहचे कौतुक करताना एक मोठं वक्तव्य केलं आहे, जे सध्या खूपच चर्चेत आहे.
क्रिकेटच्या इतिहासात डॉन ब्रॅडमन यांच्या परिचयाची गरज नाही. या खेळात त्यांनी अनेक महान विक्रम केले आहेत, जे आजही अतूट आहेत. यातील एक कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च सरासरीचा विक्रमही आहे. ब्रॅडमन यांची कसोटी क्रिकेटमधील सरासरी ९९.९ आहे आणि त्यांचा हा विक्रम आजही अबाधित आहे. पण त्या काळात जर जसप्रीत बुमराह असता, तर ब्रॅडमन हा पराक्रम करू शकले नसते, असे ॲडम गिलख्रिस्टचे मत आहे.
गिलख्रिस्टकडून बुमराहचे कौतुक –
बुमराहचे कौतुक करताना गिलख्रिस्ट क्लब फेयरी पॉडकास्टमध्ये म्हणाला, ‘मी त्याला रेटिंग देत नाही, जागतिक क्रिकेटमध्ये त्याला मिळालेल्या रेटिंगसाठी कोणताही नंबर योग्य नाही. त्याने आपल्या गोलंदाजीने अगदी ब्रॅडमनलाही आव्हान दिले असते. जर त्यांनी बुमराहचा सामना केला असता, तर त्यांची ९९ ची (फलंदाजीची) सरासरी खूपच कमी राहिली असती. ज्याच्यावर ते विराजमान आहेत. त्यामुळे बुमराहसमोर कोणतेही मोठे रेटिंग लहानच आहे.’
हेही वाचा – Anuj Rawat : आयपीएलला प्राधान्य देणे ‘या’ खेळाडूला पडणार महागात, गुजरात टायटन्ससाठी रणजी संघाची सोडली साथ
बुमराहसाठी २०२४ वर्ष खूप चांगले होते –
२०२४ हे वर्ष बुमराहसाठी खूप चांगले होते. तो या वर्षात सर्वांधिक कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये १५१.२ षटके टाकली होती. त्यामुळे पाठीच्या समस्येमुळे तो सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करू शकला नाही. या पाच सामन्यांत त्याने १३.०६ च्या सरासरीने ३२ विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये तीनदा पाच विकेट्स आणि ६/७६ ची सर्वोत्तम कामगिरी आहे. ज्यासाठी त्याला मालिकावीरचा पुरस्कार देण्यात आला.