Adam Milne breaks Pathum Nisanka’s bat: न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला गेला. न्यूझीलंडच्या ओव्हलवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान संघाने शानदार कामगिरी करत विजय मिळवला. अ‍ॅडम मिल्ने या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याने ५ विकेट्ससह आपल्या जलद गतीने कहर केला. दरम्यान या सामन्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अॅडम मिल्नेने पाथुम निसांकाची बॅट तोडली –

न्यूझीलंडचा गोलंदाज अॅडम मिल्ने त्याच्या वेगवान गोलंदाजीसाठी सर्वत्र ओळखला जातो. या सामन्यातही त्याने श्रीलंकेच्या डावातील पहिल्याच षटकातील पाचवा चेंडू वेगाने टाकला. फलंदाज पथुम निसांकाने या चेंडूचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू त्याच्या बॅटला लागताच बॅट चेंडूचा वेग झेलू शकली नाही. ज्यामुळे बॅट तुटली. इतकेच नाही तर बॅट तुटल्यामुळे पथुमला दुसऱ्या बॅटने पुढील डावाची सुरुवात करावी लागली. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे, तर आयसीसीने त्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

अॅडम मिल्नेची उत्कृष्ट कामगिरी –

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात अॅडम मिल्नेला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मिल्नेने सामन्यात ४ षटकात केवळ २६ धावा देत ५ बळी घेतले. त्याची टी-२० कारकिर्दीतील पाच विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ होती. यासह त्याच्या टी-२० कारकिर्दीतील ४२ विकेट्सही पूर्ण झाल्या. मिल्नेने ३७ सामन्यांच्या कारकिर्दीत एकदाच ४ विकेट्स घेतल्या आहेत.

न्यूझीलंडने मोठा विजय नोंदवला –

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ १९ षटकात अवघ्या १४१ धावा करत सर्वबाद झाला. श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने केवळ १ गडी गमावून लक्ष्य गाठले. टीम सेफर्टने ४३ चेंडूत ७९ धावांची शानदार खेळी केली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adam milne breaks pathum nisankas bat with his fast delivery in nz vs sl match vbm