पीटीआय, बर्लिन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन महिन्यांच्या आत भारताच्या १७ वर्षीय आदिती स्वामीने दुसऱ्यांदा जागतिक विजेतेपद पटकावले. गेल्याच महिन्यात युवा जागतिक स्पर्धेत सुवर्ण यश मिळविल्यावर आदितीने वरिष्ठ गटात शनिवारी कम्पाऊंडच्या वैयक्तिक प्रकारातही ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवले. तिरंदाजीच्या एकाच जागतिक स्पर्धेत दोन सुवर्णपदके पटकाविण्याची भारताची ही पहिलीच वेळ ठरली. भारतीय महिला संघाने शुक्रवारीच सांघिक सुवर्णपदक मिळवले होते. त्यानंतर शनिवारी आदिती पहिली आणि सर्वात तरुण वैयक्तिक सुवर्णपदक विजेती ठरली.

सांघिक सुवर्णपदकानंतर वैयक्तिक प्रकारात खेळताना अंतिम फेरीत आदितीने मेक्सिकोच्या आंद्रेआ बेसेराचा १४९-१४७ असा पराभव केला. लक्ष्यभेदात असलेली कमालीची अचूकता हे आदितीच्या यशाचे वैशिष्टय़ ठरले. यामुळे आदितीने मेक्सिकोच्या तुल्यबळ आंद्रेआचा दोन गुणांनी सहज पराभव केला. जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानावर असणाऱ्या आंद्रेआने उपउपांत्यपूर्व फेरीत गतविजेती सारा लोपेझचा पराभव केला होता. अंतिम फेरीत मात्र, आंद्रेआला भारताच्या सहाव्या मानांकित आदितीने निष्प्रभ केले.

आदितीने पहिल्या चार फेऱ्यात १२ अचूक वेध घेताना आंद्रेआवर तीन गुणांची आघाडी मिळवली होती. अखेरच्या पाचव्या फेरीत फक्त एकदाच आदितीचा तीर अचूक निशाणावर लागला नाही. पण, तोवर आदितीने दुसऱ्या जागतिक सुवर्णपदकावर नाव कोरले होते.त्यापूर्वी, आदितीने उपांत्य फेरीत आपली आदर्श खेळाडू ज्योती सुरेखा वेन्नमचा १४९-१४५ असा पराभव केला होता. ज्योतीने तुर्कीच्या इपेक टोमर्कविरुद्ध अचूक १५० गुण मिळवून कांस्यपदक मिळवले. जागतिक स्पर्धेच्या तिसऱ्या अनुभवानंतर ज्योतीच्या नावावर आता एक सुवर्ण, चार रौप्य आणि तीन कांस्य अशी आठ पदके झाली आहेत.

शंभर टक्के योगदान दिले आणि एकाग्रता भंग होऊ दिली नाही. प्रवीणसरांचे मार्गदर्शन मोलाचेच आहे. त्यांनीच मला घडवले आणि आता भारतीय संघाबरोबर असलेल्या परदेशी प्रशिक्षक सर्जिओ यांचेही मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे. एक उद्दिष्ट पार केले आहे. कम्पाऊंड प्रकाराचा ऑलिम्पिकमध्ये समावेश नाही, पण आशियाई क्रीडा स्पर्धेत या क्रीडा प्रकाराचा समावेश आहे. तेथेही अशीच कामगिरी करायची आहे आणि त्यासाठी लगेच सरावाला सुरुवात करायची आहे. – आदिती स्वामी