सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा
मकर संक्रांतीच्या दिवशी वानखेडेवर केरळचा पतंग कापत मुंबईने आपल्या चाहत्यांना विजयाचा तीळगूळ दिला. कर्णधार आदित्य तरेच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने केरळचा सहा विकेट्स राखून पराभव केला आणि सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या बाद फेरीच्या पहिल्या सामन्यात विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या केरळला मुंबईने १६० धावांवर रोखले आणि सफाईदारपणे या आव्हानाचा पाठलाग केला.
मुंबईने नाणेफेक जिंकत केरळला फलंदाजीसाठी पाचारण केले. दुसऱ्याच षटकात शार्दुल ठाकूरने मुंबईला यश मिळवून दिले. संजू सॅमसन (२२) हा मुंबईच्या मार्गातला मोठा अडथळा होता. त्याने रोहन प्रेमच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी रचली, पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. सॅमसन बाद झाल्यावर प्रेमने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत अर्धशतकी खेळी साकारली. ५२ धावांवर असताना त्याला नोबॉलवर जीवदानही मिळाले, पण त्याला त्याचा फायदा उचलता आला नाही. प्रेमने ४५ चेंडूंत ७ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६९ धावा केल्या. युवा वेगवान गोलंदाज सागर त्रिवेदीने यावेळी तीन बळी मिळवले, तर मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णीने भेदक मारा करत दोन फलंदाजांना बाद केले.
केरळच्या १६१ धावांचा पाठलाग करताना मुंबईने दोन्ही सलामीवीर झटपट गमावले, पण त्यानंतर तरे आणि सिद्धेश लाड (३६) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी रचत संघाला सावरले. तरेने यावेळी सातत्यपूर्ण फलंदाजी करत कर्णधाराला साजेशी खेळी साकारली. त्याने ४६ चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. विजयासाठी २२ धावांची गरज असताना मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. त्यानंतर अभिषेक नायरने संघाचा डोलारा सांभाळला. नायरने २० चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह नाबाद ३८ धावांची खेळी साकारली. त्याने २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार लगावत मुंबईचा विजय साजरा केला.

संक्षिप्त धावफलक
केरळ : २० षटकांत ७ बाद १६० (रोहन प्रेम ६९; सागर त्रिवेदी ३/३४, धवल कुलकर्णी २/२९) पराभूत वि. मुंबई : १९.१ षटकांत ४ बाद १६४ (आदित्य तरे ७१, अभिषेक नायर नाबाद ३८; उन्नीकृष्णन मनुकृष्णन २/३६).

गुजरातचा दिल्लीवर सहज विजय
मुंबई : तडफदार फलंदाजीच्या जोरावर गुजरातने दिल्लीवर सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेच्या पहिल्या बाद फेरीत आठ विकेट्सने सहज विजय मिळवला. सलामीवीर उन्मुक्त चंदच्या शतकी खेळीच्या जोरावर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना १७० धावा केल्या होत्या. उन्मुक्तने ५८ चेंडूंमध्ये आठ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर १०३ धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. पण बोथट गोलंदाजीमुळे त्यांना सामना गमवावा लागला. गुजरातकडून प्रियांक पांचालने ८ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४४ चेंडूंत नाबाद ६८ धावांची खेळी साकारत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

उत्तर प्रदेशचा ‘समर्थ’पणे विजय
मुंबई : अचूक मारा आणि समर्थ सिंगच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर उत्तर प्रदेशने झारखंडवर नऊ विकेट्सने दमदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या झारखंडचा डाव उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांनी १३३ धावांवर रोखला. झारखंडच्या शशीम राठोर (४०) आणि सौरभ तिवारी (३८) यांच्या खेळीच्या जोरावर झारखंडला शतकाची वेस ओलांडता आली. उत्तर प्रदेशने हे आव्हान ११२ धावांच्या सलामीच्या जोरावर सहजपणे पूर्ण केले. समर्थने ६४ धावा व प्रशांत गुप्ताने नाबाद ४२ धावा केल्या.

Story img Loader