एन. श्रीनिवासन यांना पुढील महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्यकारी मंडळाच्या बैठकीला हजर राहण्यापासून रोखण्यात यावे, असे आवाहन करणारे पत्र बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदित्य वर्मा यांनी आयसीसीचे अध्यक्ष अ‍ॅलन इसाक यांना लिहिले आहे.
आयपीएल घोटाळ्याप्रकरणी आयसीसीने मौनव्रत धारण केले आहे, असा आरोप वर्मा यांनी आपल्या पत्रात केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याप्रकरणी आपला निर्णय देईपर्यंत तामिळनाडूचे उद्योगपती श्रीनिवासन यांना आयसीसीच्या बैठकीला हजेरी लावण्यापासून प्रतिबंध करण्यात यावा, असे नमूद करण्यात आले आहे.
आयपीएलसंदर्भात चौकशी करण्यात येणार नसल्याच्या आयसीसीच्या निर्णयाबाबत वर्मा यांनी आपल्या पत्रात खरपूस समाचार घेतला आहे. ‘‘आयसीसीच्या आचारसंहितेनुसार कोणताही खेळाडू अनैतिक कृत्यात दोषी आढळल्यास आयसीसी जबाबदारीने त्या प्रकरणाची चौकशी करते, परंतु मला हे सांगायला अतिशय दु:ख होते आहे की, आतापर्यंत आयसीसीने या प्रकरणी कोणताच रस दाखवलेला नाही,’’ असे वर्मा यांनी पत्रात म्हटले आहे.
‘‘आयसीसी म्हणजे आता इंडिया सिमेंट क्रिकेट झाले आहे का?’’ असा सवाल या वेळी त्यांनी केला.

Story img Loader