पीटीआय, नवी दिल्ली : तब्बल एक तप म्हणजे १२ वर्षे वाट पाहिल्यानंतर भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेल्या वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळल्याचा फायदा झाल्याचे सांगितले. बांगलादेश दौऱ्यात संधी मिळाल्यावर उनाडकटने आपली निवड सार्थ ठरविणारी कामगिरी केली. मायदेशात परतल्यावर बोलताना उनाडकट म्हणाला, ‘मला नेहमीच लाल चेंडूंवर खेळणे आवडते. कोरोनाच्या कालावधीत रणजी करंडक स्पर्धा न झाल्यामुळे मी लाल चेंडूने खेळण्यास आसुसलो होतो. पाच दिवसांचे क्रिकेट खेळणे मला अधिक आवडते.’ बारा वर्षांपूर्वी कसोटी सामना खेळल्यानंतर उनाडकट कारकीर्दीतला दुसरा सामना बांगलादेशविरुद्ध खेळला.
बांगलादेशविरुद्ध पहिल्या सामन्यात आठ गडी बाद करणाऱ्या कुलदीप यादवला दुसऱ्या कसोटीसाठी वगळून उनाडकटला संधी देण्यात आली. तेव्हा संघ निवडीवर टीका झाली होती. उनाडकट म्हणाला,‘कुलदीपला वगळल्यामुळे होणाऱ्या टीकेचे माझ्यावर कसलेही दडपण नव्हते. आपली कामगिरी चोख पार पाडायची इतकेच मी निश्चित केले होते. या सामन्यात मी पहिला कसोटी बळीही मिळविला. माझ्यासाठी हा सामना लक्षात राहण्यासारखा असेल.’
राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याचा विश्वास होता. यासाठी मला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याने आत्मविश्वास आणि फायदा मिळाला. विकेट मिळत नसल्या, तरी प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दडपण टाकण्याचे काम गोलंदाजाचे असते. त्यामळे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायची याची खूणगाठ पक्की होती. त्यानुसारच गोलंदाजी केली, असे उनाडकट म्हणाला.