* फेडररला नमवत जो विलफ्रेड त्सोंगा उपांत्य फेरीत
* सेरेना विल्यम्स, सारा इराणी उपांत्य फेरीत
आक्रमक, वेगवान आणि भन्नाट शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या फ्रान्सच्या जो विलफ्रेड त्सोंगाने मंगळवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत इतिहास घडवला. तिशीतही जेतेपदाच्या शर्यतीत असणाऱ्या द्वितीय मानांकित रॉजर फेडररला चीतपट करत त्सोंगाने उपांत्य फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे त्सोंगाने सरळ सेट्समध्ये ७-५, ६-३, ६-३ अशी फेडररवर मात करत वर्चस्व सिद्ध केले. घरच्या मैदानावर उपांत्य फेरी खेळण्याची त्सोंगाची ही पहिलीच वेळ असणार आहे. २००८मध्ये गेअल मॉनफिल्स याच्यानंतर फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळणारा तो पहिलाच खेळाडू असणार आहे.
कारकीर्दीत तब्बल १७ ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर आणि उभय लढतींमध्ये ९-३ अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या फेडररचे संस्थान त्सोंगाने खालसा केले. रोलँड गॅरोसवर आपल्या कारकीर्दीतील विक्रमी ५८वा सामना खेळणाऱ्या आणि ३४व्या ग्रँड स्लॅम उपांत्य फेरीच्या दिशेने आगेकूच करणाऱ्या फेडररचा झंझावात त्सोंगाने समर्थपणे रोखला.
उपांत्य फेरीत त्सोंगाचा मुकाबला स्पेनच्या डेव्हिड फेररशी होणार आहे. चौथ्या मानांकित फेररने स्पेनच्याच ३२व्या मानांकित टॉमी रॉब्रेडोचा ६-२, ६-१, ६-१ असा धुव्वा उडवला.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली सेरेना विल्यम्स आणि इटलीची सारा इराणी यांनी उपांत्य फेरीत धडक मारली. २००३ नंतर फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची सेरेनाची ही पहिलीच वेळ आहे. सेरेनाने बिगरमानांकित रशियाच्या स्वेतलाना कुझनेत्सोवाचा ६-१, ३-६, ६-३ असा पराभव केला. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद कारकीर्दीत दुसऱ्यांदा नावावर करण्यासाठी सेरेना उत्सुक आहे. या सामन्यातही पहिला सेट जिंकत तिने दमदार सुरुवात केली. मात्र २००९मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या स्वेतलानाने पुनरागमन करत दुसरा सेट नावावर करत बरोबरी केली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये मात्र सेरेनाने वर्चस्व राखत उपांत्य फेरीत स्थान पटकावले. सलग २९ सामन्यांत विजय मिळवत सेरेनाने आपले प्रभुत्व सिद्ध केले. उपांत्य फेरीत सेरेनाचा मुकाबला सारा इराणीशी होणार आहे. साराने पोलंडच्या चौथ्या मानांकित अॅग्निझेस्का रडवानस्काला नमवत उपांत्य फेरी गाठली. साराने गेल्यावर्षी फ्रेंच स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. साराने रडवानस्कावर ६-४, ७-६ (६) अशा फरकाने विजय मिळवला.
भारताचे आव्हान संपुष्टात
फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि लिएण्डर पेस दोघांचा आपापल्या साथीदारांसह पराभव झाल्याने भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. एकेरी प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणाऱ्या सर्बियाच्या जेलेना जान्कोविकला मिश्र दुहेरीत मात्र पेससह खेळताना दुसऱ्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. अमेरिकेच्या लिइझेल ह्य़ुबेर आणि ब्राझीलच्या मार्सेलो मेलो जोडीने पेस-जान्कोविचचा ७-५, ६(१)-७, १०-२ असा पराभव केला. महिला दुहेरीत अमेरिकेच्या बेथानी मॅटेक सँड्सच्या साथीने खेळणाऱ्या सानिया मिर्झाचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. रशियाच्या अॅनास्टासिया पॅव्हल्युचेनकोव्हा आणि चेक प्रजासत्ताकच्या ल्युसी साफारोव्हा जोडीने सातव्या मानांकित सानिया-बेथानी जोडीविरुद्ध खेळताना पहिला सेट ७-६ (०) असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये ५-३ असे आघाडीवर असताना बेथानीला झालेल्या दुखापतीमुळे सानिया-बेथानी जोडीने माघार घेतली. सानियाचे मिश्र दुहेरीतील आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे.