भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. सुनील छेत्रीने मंगळवारी १४ जूनला हाँगकाँगविरोधात एएफसी आशियाई कपच्या पात्रता सामन्यात हा रेकॉर्ड केला. या सामन्यात सुनील छेत्रीने ८४ वा गोल केला. यासोबतच सुनील छेत्रीने रिअल मॅड्रिडचे दिग्गज आणि हंगेरीचे फुटबॉलर फेरेंक यांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली. सुनील छेत्रीने याआधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर फुटबॉलचे जादूगर म्हणून ओळखले जाणारे पेले यांना मागे टाकलं आहे.
सुनील छेत्रीने याआधी ऑक्टोबर २०२१ मध्ये पेले यांच्या ७७ गोलचा रेकॉर्ड मोडला होता. सुनील छेत्री सध्या सक्रीय असणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंपैकी फक्त रोनाल्डो आणि मेस्सीच्या मागे असून यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पेले यांची बरोबरी साधणे अभिमानास्पद बाब-छेत्री
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत क्रिस्तियानो रोनाल्डो पहिल्या क्रमांकावर आहे. रोनाल्डोच्या नावे ११७ गोल आहेत. मेस्सी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८६ गोल केले असून चौथ्या क्रमांकावर आहे. सुनील छेत्रीने अजून सहा गोल केल्यास तर मेस्सीलाही मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. सध्या इराणचे अली देई १०९ गोलसोबत दुसऱ्या क्रमांकावर आणि मलेशियाचे मुख्तार दाहरी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मुख्तार दाहरीने आपल्या करिअरमध्ये ८९ आंतरराष्ट्रीय गोल केले.
सुनील छेत्री लवकरच मेस्सीलाही मागे टाकेल अशी भारतीयांना आशा आहे. भारतीय फुटबॉल संघाने कोलकातामध्ये १४ जूनला एएफसी आशियाई कपच्या पात्रता सामन्यात हाँगकाँग संघाला ४-० ने धुळ चारली. भारतीय संघ या सामन्याआधीच एएफसी आशियाई कप २०२३ साठी पात्र ठरला होता. हाँगकाँगविरोधात सामन्यात भारताकडून अन्वर अली, सुनील छेत्री, मानवीर सिंह आणि इशान पंडिता यांनी गोल केले.
भारताने कंबोडियाचा २-० ने पराभव करत स्पर्धेची विजयी सुरुवात केली होती. या सामन्यात दोन्ही गोल सुनील छेत्रीने केले होते. दुसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधाराने अफगाणिस्तानविरोधात एक गोल करत विजयाचा पाया रचला होता.