Afghanistan vs Australia Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये मध्ये २८ फेब्रुवारीला शुक्रवारी ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. उपांत्य फेरीच्या दृष्टिकोनातून हा सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव करत इंग्लिश संघाला स्पर्धेतून बाहेर केले आहे. आता ऑस्ट्रेलियाचा संघ अफगाण संघासमोर असणार आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी पत्रकार परिषदेत पुढील लढतीविषयी नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊया.
अफगाणिस्तानने बुधवारी (२६ फेब्रुवारी) इंग्लंडवर आठ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवत स्पर्धेतून बाहेर केले. आता हशमतुल्ला शाहिदीचा संघ शुक्रवारी लाहोरमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यापूर्वी बोलताना पत्रकार परिषदेत संघाचा कर्णधार हशमतुल्ला आफ्रिदीला मॅक्सवेलविरूद्ध संघाची काय योजना असेल, असे विचारले होते. यावर तो काय म्हणाला पाहूया.
शाहिदी पत्रकार परिषदेत म्हणाला, “तुम्हाला काय वाटतं की, आम्ही फक्त मॅक्सवेलविरूद्ध खेळायला आलोय? असं होईल असं वाटतं का? आम्ही संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघासाठी रणनिती आखली आहे. मला माहित आहे की तो (मॅक्सवेल) २०२३ च्या विश्वचषकात चांगला खेळला आहे, पण ती भूतकाळातील गोष्ट आहे.”
शाहिदी म्हणाला, “त्यानंतर आम्ही त्यांना टी-२० विश्वचषकात पराभूत केले आणि आम्ही सर्व विरोधी संघांचा विचार केला. आम्ही कोणत्याही एका खेळाडूसाठी नियोजन करण्यासाठी मैदानात उतरत नाही. रणनितीसह उतरण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. आम्ही केवळ मॅक्सवेलविरुद्ध खेळत नाही. आम्ही ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळणार आहोत.”
मॅक्सवेलने २०२३ च्या विश्वचषकात नेमकं काय केलं होत?
२९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने १०० पेक्षा कमी धावांत सात गडी गमावले होते, पण त्यानंतर मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात शानदार खेळी खेळली. त्याने आपल्या संघाला अविश्वसनीय विजय मिळवून दिला आणि काही दिवसांनंतर ऑस्ट्रेलियन संघाने आपला विक्रमी सहावा विश्वचषक जिंकला. मात्र, अफगाणिस्तानने त्या मोठ्या पराभवाचा बदला एका वर्षानंतर टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयाने घेतला.
अफगाणिस्तानने आयसीसी स्पर्धेत दुसऱ्यांदा इंग्लंडचा पराभव केला. यापूर्वी २०२३ च्या विश्वचषकात भारताने इंग्लंडला पराभूत केले होते. इंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. चाहत्यांनी मैदानावर उतरत आनंद साजरा केला. अफगाणिस्तानने जर ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचू शकतो.
अफगाणिस्तान जर उपांत्य फेरीत पोहोचला तर एका वर्षापेक्षा कमी कालावधीत तो दुसऱ्यांदा आयसीसी स्पर्धेची उपांत्य फेरी खेळणार आहे. २०२४ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये संघाने सेमीफायनल खेळली होती.