AFG vs AUS Weather Update: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ही स्पर्धा आता अखेरच्या आणि रोमांचक वळणावर येऊन ठेपली आहे. एका गटातून भारत आणि न्यूझीलंड हे संघ उपांत्य फेरीसाठी पोहोचले आहेत. तर दुसऱ्या गटातील चित्र अधिक गुंतागुंतीचं झालं आहे. हा गुंता सोडवण्यासाठी अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील महत्त्वाचा आणि अटीतटीचा सामना रंगणार आहे. पण या सामन्यात पाऊस गोंधळ घालण्याची चिन्हे दिसत आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात शुक्रवारी, २८ फेब्रुवारीला लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर ICC चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्वात रोमांचक सामन्यांपैकी एक सामना रंगणार आहे. स्पर्धेतील उपांत्य फेरीचे स्पर्धक ठरवण्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण या सामन्याता विजेता थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.
पण लाहोरमधील खराब हवामानामुळे सामना पूर्णपणे रद्द होण्याची दाट शक्यता आहे. या स्पर्धेतील आतापर्यंत ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश हे दोन सामने पावसामुळे रद्द केले आहेत.
AFG vs AUS हवामानाचा अंदाज
आगामी अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी हवामानाचा अंदाजही चिंतेत टाकणारा आहे. सामन्याच्या दिवशी पावसाचा अंदाज ७५ टक्के आहे. लाहोरमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि सामना सुरू होण्याच्या अगदी अगोदर मुसळधार पाऊस पडण्याची ३५ टक्के शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार दुपारी ४ वाजल्यापासून पावसाची शक्यता कमी असल्याचे दाखवत आहे.
सामन्याचा निकाल लागण्यासाठी कमीत कमी २० षटकांचा सामना होणं अनिवार्य असणार आहे. भारतीय वेळेनुसार चॅम्पियन्स ट्रॉफीतील सामने दुपारी २.३० वाजता सुरू होतात. त्यामुळे २० षटकांचा सामना सुरू होण्यासाठी भारतीय वेळेनुसार ७.३० हा कट ऑफ टाईम असेल. तोपर्यंत पावसाने विश्रांती घेत सामना सुरू झाला तर सामना पाहायला मिळेल, नाहीतर संपूर्ण सामना हा रद्द करण्यात येईल.
अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होणार?
जर अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया सामना पावसामुळे रद्द झाला तर ऑस्ट्रेलिया चार गुणांसह उपांत्य फेरीसाठी पात्र होईल, तर अफगाणिस्तान -०.९९० च्या नेट रन रेट आणि तीन गुणांसह आपल्या मोहिमेला पूर्णविराम देईल. कारण अफगाणिस्तान दक्षिण आफ्रिकेचा +२.१४० रनरेट त्यांच्यापेक्षा उत्तम असल्याने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.