बांगलादेशविरूद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानने यजमानांवर २२४ धावांनी विजय मिळवला. कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर हा अफगाणिस्तानचा दुसरा विजय ठरला. या विजयासह कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाल्यापासून सर्वात कमी कालावधीत दुसरा कसोटी विजय मिळवण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी अफगाणिस्तानने बरोबरी केली.
बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या पहिल्याच कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा संघ सरस ठरला. ३९८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला केवळ २०५ धावाच करता आल्या. कसोटी कारकिर्दीतील सर्वात तरूण कर्णधार ठरलेल्या रशीद खानने सामन्यात अर्धशतक ठोकले आणि आपल्या फिरकीच्या जाळ्यात ११ गड्यांना अडकवले. त्यासोबत त्याने पहिल्या डावात अर्धशतकी खेळीही केली. त्याच्या या कामगिरीच्या बळावर त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅलन बॉर्डर आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खान यांच्या एकाच कसोटी सामन्यात अर्धशतकी खेळी आणि १० हून अधिक बळी टिपण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. याशिवाय, कर्णधार म्हणून खेळताना पहिल्यावहिल्या सामन्यातच अशी कामगिरी करणारा रशीद पहिलाच खेळाडू ठरला.
Captains scoring a fifty and taking 10+ wickets in a Test match:
Imran Khan (117 & 11/117) v Ind, Faisalabad, 1983
Allan Border (75 & 11/91) v WI, SCG, 1989
Rashid Khan (51 & 11/104) v Ban, Chattogram, 2019
Rashid only one to do on captaincy debut!!#BanvAfg
— Bharath Seervi (@SeerviBharath) September 9, 2019
दरम्यान, नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ३४२ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करता बांगलादेशच्या संघाने पहिल्या डावात केवळ २०५ धावा केल्या. ही आघाडी पुढे नेत अफगाणिस्तानने दुसऱ्या डावात २६० धावा केल्या आणि बांगलादेशला विजयासाठी ३९८ धावांचे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना शादमान इस्लाम (४१) आणि शाकिब अल हसन (४४) या दोघांनी काही काळ झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण सामना संपण्यासाठी अवघी २ षटके शिल्लक असताना अफगाणिस्तानने बांगलादेशचा शेवटचा गडी टिपला आणि सामना खिशात घातला.