करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ सर्व खेळाडू घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. एरवी भारतीय खेळाडूंसह अनेक खेळाडू व्यस्त वेळापत्रकाबद्दल तक्रार करत असताना आपण ऐकलं आहे. परंतू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका खेळाडूने एकाच दिवशी दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळून दोन्ही सामन्यात अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद शेहजादच्या नावावर हा पराक्रम जमा आहे.
२०१७ साली संयुक्त अरब अमिरातीत आयसीसीच्या ८ सहयोगी सदस्य देशांची डेझर्ट टी-२० स्पर्धा भरवण्यात आली होती. २० जानेवारी २०१७ रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी साडेअकरा वाजता अफगाणिस्तान विरुद्द ओमान यांच्यात पहिला सामना रंगला होता. या सामन्यात ओमानने प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानला विजयासाठी १५० धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात शेहजादने ६० चेंडूत ८० धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या खेळीत शेहजादने ३ षटकार आणि ८ चौकार लगावले होते. यानंतर स्कॉटलंड विरुद्ध आयर्लंड सामना खेळवला गेला, ज्यात आयर्लंडने स्कॉटलंडवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
यानंतर २० जानेवारी रोजी रात्री ९ वाजता या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला गेला. अंतिम सामन्यात आयर्लंडची फलंदाजी अफगाणिस्तानच्या गोलंदाजांसमोर कोलमडली. आयर्लंडचा संघ या सामन्यात ७१ धावाच करु शकला. यानंतर मैदानात उतरलेल्या अहमद शेहजादने पुन्हा एकदा आपल्या आक्रमक फलंदाजीचं दर्शन घडवत ४० चेंडूत ९ चौकार आणि १ षटकारासह ५२ धावा केल्या. अवघ्या ८ षटकात आयर्लंडने दिलेलं आव्हान पूर्ण करत अफगाणिस्तानने १० गडी राखत हा सामना जिंकला होता.