Rahmanullah Gurbaz distributed money to poor people in Ahmedabad: एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या स्पर्धेत अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकला नसला, तरी अनेक मोठ्या संघांना पराभूत करून चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला. विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाज दिवाळीच्या खास प्रसंगी रस्त्याच्या कडेला झोपलेल्या गरीबांना मदत करताना दिसत आहे. गुरबाजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहते अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूचे कौतुक करत आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये गुरबाज रात्री रस्त्याच्या कडेला झोपलेल्या गरिबांजवळ पैसे ठेवताना दिसत आहे. गुरबाजने गाढ झोपलेल्या गरीब लोकांच्या शेजारी ५००-५०० च्या नोटा ठेवल्या, जागे झालेल्या महिलेच्या हातात पैसे दिले आणि नंतर शांतपणे गाडीतून निघून गेला. व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादच्या एका रेडिओ जॉकीचा आवाजही ऐकू येतो, ज्यामध्ये तो गुरबाजच्या या उदात्त कार्याचे कौतुक करत आहे. अफगाणिस्तानच्या लोकांमध्ये आणि खेळाडूंमध्ये भारताबद्दल खूप प्रेम आहे. यामुळेच अफगाणिस्तानच्या चाहत्यांना त्यांच्याच संघानंतर भारतीय संघ सर्वाधिक आवडतो. अफगाणिस्तानचे अनेक चाहते २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला पाठिंबा देताना दिसत आहेत.
रहमानउल्ला गुरबाजचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुरबाजचे भारतातही खूप चाहते आहेत. अफगाणिस्तानचा सर्वात लोकप्रिय खेळाडू राशिद खान व्यतिरिक्त, रहमानउल्ला गुरबाज देखील दरवर्षी किमान दोन महिने भारतात राहतो. तो आयपीएलमधील महत्त्वाचा खेळाडू आहे. तो गुजरात टायटन्ससाठीही क्रिकेट खेळला आहे, त्यावेळी अहमदाबाद आयपीएलचे त्यांचे होम ग्राउंड होते. त्यामुळे गुरबाजचे अहमदाबादशीही खास नाते आहे. मात्र, या विश्वचषकात अफगाणिस्तानचा शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला गेला, ज्यात अफगाणिस्तानला ५ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला.
हेही वाचा – Team India: भारतीय संघाची धमाल दिवाळी पार्टी, पत्नी आणि मुलांसह लावली हजेरी, पाहा VIDEO
भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याचे अफगाणिस्तान संघाशी अतूट नाते आहे. पाकिस्तानला पराभूत करणाऱ्या अफगाणिस्तान संघासोबतचा इरफान पठाणचा डान्सही व्हायरल झाला होता. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तानचा प्रवास अप्रतिम होता. हशमतुल्लाह शाहिदीच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान संघाने माजी चॅम्पियन इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभूत करून मोठा धमाका केला.