Afghanistan won against South Africa rashid khan gurbaz: अफगाणिस्तान संघाने शारजा इथे झालेल्या दुसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाला नमवत मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. शतकवीर रहमनुल्ला गुरबाझ आणि वाढदिवसाच्या दिवशीच पाच विकेट्स पटकावणारा रशीद खान अफगाणिस्तानच्या विजयाचे शिल्पकार ठरले.

पहिल्या वनडेत अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेला १०६ धावांतच गुंडाळलं आणि हे छोटेखानी लक्ष्य पार केलं. दुसऱ्या वनडेत अफगाणिस्तानने ३११ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव धावात गुंडाळत १७७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिलाच मालिका विजय आहे.

गुरबाझची शतकी खेळी

नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गुरबाझ आणि रियाझ हसन यांनी ८८ धावांची खणखणीत सलामी दिली. यानंतर गुरबाझला रहमत शाहची साथ लाभली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी केली. १० चौकार आणि ३ षटकारांसह १०५ धावांची वेगवान खेळी करुन गुरबाझ तंबूत परतला. गुरबाझचं हे सातवं वनडे शतक आहे. ५० धावांची खेळी करुन रहमतही बाद झाला. यानंतर ओमरझाईने ५० चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ८६ धावांची तडाखेबंद खेळी केली. गुरबाझ, रहमत आणि ओमरझाई यांच्या अफलातून खेळीच्या बळावर अफगाणिस्तानने ३११ धावांची मजल मारली. दक्षिण आफ्रिकेतर्फे लुंगी एन्गिडी, नांद्रे बर्गर, पीटर, एडन मारक्रम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

नोएडातलं मैदान बीसीसीआयसाठी नामुष्की का ठरलं?

या प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना तेंबा बावूमा आणि टोनी द झोरी यांनी ७३ धावांची चांगली सलामी दिली. ३८ धावा करून बावूमा बाद झाला. यानंतर अफगाणिस्तानच्या फिरकी आक्रमणासमोर आफ्रिकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. रशीद खानने चाहत्यांना वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट देत ९ षटकात अवघ्या १९ धावांच्या मोबदल्यात ५ विकेट्स घेतल्या. नांगेलिया खारोटेने ४ विकेट्स घेत रशीदला तोलामोलाची साथ दिली. दक्षिण आफ्रिकेच्या सहा फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.

या विजयासह अफगाणिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. अफगाणिस्तानने आयर्लंड, झिम्बाब्वे, बांगलादेश, नेदरलँड्स, स्कॉटलंड या देशांविरुद्ध वनडे मालिका जिंकली आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेसारख्या अव्वल संघाविरुद्ध वनडे मालिका जिंकत अफगाणिस्तानने मोठी झेप घेतली आहे. आठवडाभरापूर्वी अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात नोएडा इथे टेस्ट आयोजित करण्यात आली होती. मात्र धुवाधार पावसामुळे एकही चेंडू न टाकता नाणेफेक न होताच ही टेस्ट रद्द करावी लागली. या निराशेतून बाहेर पडत अफगाणिस्तानने दमदार कामगिरी केली आहे.