अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश विरूद्ध आजपासून एकमेव कसोटी सामना सुरू झाला आहे. बांगलादेशच्या चित्तगाँग येथे हा सामना सुरू आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खान याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या कसोटी सामन्याचा निकाल दोनही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे. मात्र अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खान याने या कसोटीसाठी मैदानावर पाय ठेवताच त्याने एक नवा इतिहास रचला आहे. रशीद खान कसोटी क्रिकेटमधील सर्वात तरूण कर्णधार ठरला आहे. रशीद खान वयाच्या २० व्या वर्षी कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवत आहे. याआधी इतक्या तरूण वयात हा बहुमान कोणालाही मिळवणे शक्य झाले नव्हते. कसोटी क्रिकेटमधील यशस्वी कर्णधार असलेल्या स्टीव्ह स्मिथ किंवा विराट कोहली यांनाही ही कामगिरी करता आली नव्हती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्वचषक २०१९ या स्पर्धेत अफगाणिस्तानच्या संघाला एकही सामना जिंकता आला नाही. त्यांच्या या निराशाजनक कामगिरीनंतर अफगाणिस्तान संघाच्या नेतृत्वात बदल करण्यात आला. अफगाणिस्तानच्या संघाचे नेतृत्व २० वर्षीय फिरकीपटू रशीद खान याच्याकडे सोपवण्यात आले. एकदिवसीय, कसोटी आणि टी २० अशा तीनही प्रकारच्या क्रिकेट प्रकारात तो अफगाणिस्तान संघाचे नेतृत्व करत आहे.

विश्वचषक स्पर्धा सुरु होण्याआधी या संघाचे नेतृत्व गुलबदीन नैब याच्याकडे सोपवण्यात आले होते. त्या आधी असगर अफगाण हा कर्णधाराच्या भूमिकेत होता. विशेष म्हणजे आता रशीद खान याच्याकडे कर्णधारपद सोपवल्यानंतर असगर अफगाण याच्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. विश्वचषक स्पर्धेआधी असगर अफगाण यांच्याकडे संघाचे नेतृत्व होते. विश्वचषकात असगरने २६ च्या सरासरीने १५४ धावा केल्या. तर नैबने २२ च्या सरासरीने १९४ धावा केल्या. शिवाय त्याने गोलंदाजीतही ९ गडी टिपले. विश्वचषक स्पर्धेआधी नैबकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते, पण त्याला संघाच्या कामगिरीत सुधारणा करता आली नाही. भारतासारख्या बलाढ्य संघाला त्यांनी कडवी झुंज दिली, पण तरीदेखील दुर्दैवाने त्यांना एकही विजय मिळवता आला नव्हता.