भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने अफगाणिस्तान क्रिकेट संघाला एक नवीन गिफ्ट दिलं आहे. लखनऊ येथील नव्याने बांधण्यात आलेलं अटल बिहारी वाजपेयी एकना मैदान आता अफगाणिस्तानच्या संघाचं घरचं (Home Ground) मैदान म्हणून ओळखलं जाणार आहे. बीसीसीआय आणि उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने अफगाण क्रिकेट बोर्डाच्या विनंतीचा स्विकार केला आहे.
अफगाणिस्तानमधील क्रिकेटला बीसीसीआयने नेहमी पाठींबा दिला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी बीसीसीआयने याआधी, अफगाण क्रिकेट बोर्डाला देहरादून आणि नोएडा येथील मैदान खुलं करुन दिलं होतं. या मैदानावर अफगाणिस्तानचा संघ काही आंतररराष्ट्रीय सामने खेळला होता. मात्र देहरादून शहरात खेळाडूंना राहण्यासाठी चांगल्या हॉटेलची व इतर सुविधांची वानवा असल्यामुळे अफगाण क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयकडे नवीन मैदान उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती. UNI वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
बीसीसीआय आणि उत्तर प्रदेश क्रिकेट बोर्डाने परवानगी दिल्यानंतर आता अफगाण क्रिकेट बोर्ड आपली अफगाणिस्तान प्रिमीअर लिग लखनऊच्या मैदानावर भरवू शकणार आहे. ४० हजार आसनक्षमता असलेलं एकना मैदान नुकतच बांधण्यात आलं आहे. या मैदानावर काही महिन्यांपूर्वी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात १ टी-२० सामना खेळवला गेला होता. याचसोबत लखनऊ विमानतळापासून हे मैदान जवळ आहे, याचसोबत परिसरात काही पंचतारांकित हॉटेल असल्यामुळे अफगाण क्रिकेट बोर्डाला हे मैदान सोयीचं ठरणार आहे.