उत्कृष्ट सांघिक खेळ करीत अफगाणिस्तानने दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेत (सॅफ) अजिंक्यपद मिळविले. अंतिम लढतीत त्यांनी गतविजेत्या भारताला २-० असे हरविले.
दशरथ रंगशाळा स्टेडियमवर झालेल्या या अंतिम सामन्यात सुरुवातीपासून अफगाणिस्तानने वर्चस्व राखले होते. त्यांचा पहिला गोल नवव्या मिनिटाला मुस्तफा अझदौह याने केला. पूर्वार्धात याच गोलच्या आधारे त्यांनी १-० अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात सामन्याच्या ५२व्या मिनिटाला संदाजर अहमदी याने आणखी गोल करीत अफगाणिस्तानला सहज विजय मिळवून दिला.
सामन्यात भारताचा स्टार खेळाडू सुनील छेत्री याला भारताचे प्रशिक्षक किम कोहरमन्स यांनी विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा अफगाणिस्तानला झाला.
भारतीय संघाच्या आक्रमक चालींमध्ये अपेक्षेइतका प्रभाव दिसून आला नाही. तसेच भारताच्या बचाव फळीतील खेळाडूंमध्ये सुसूत्रता नव्हती. त्याचाही लाभ अफगाणिस्तानच्या खेळाडूंना झाला. सामन्याच्या नवव्या मिनिटालाच मुस्तफा याने भारतीय बचावरक्षकांना चकवित संघाचे खाते उघडले. त्यानंतर बरोबरीसाठी भारतीय खेळाडूंनी प्रयत्न केले, मात्र त्यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. उत्तरार्धात सुरुवातीपासून अफगाणिस्तानच्याच खेळाडूंचे प्राबल्य होते. त्यांच्या चालींमध्ये चांगला समन्वय होता. त्याचाच फायदा घेत त्यांनी आणखी एक गोल करण्यात यश मिळविले. त्यांचा दुसरा गोल अहमदी याने करीत भारताच्या विजेतेपदाच्या आशा धूसर केल्या. भारतीय खेळाडूंनी अनेक वेळा चाली केल्या.
तथापि, शेवटची दहा मिनिटे अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी भक्कम बचाव करीत या चाली अपयशी ठरविल्या.

Story img Loader