तारौबा (त्रिनिदाद)

ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच उपांत्य फेरी गाठणाऱ्या अफगाणिस्तानची आज, गुरुवारी दक्षिण आफ्रिकेशी लढत होणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने या स्पर्धेत सातही सामन्यांत विजय नोंदवला आहे. त्यामुळे त्यांना रोखण्याचे आता अफगाणिस्तानसमोर मोठे आव्हान असेल. एडीन मार्करमच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अप्रतिम कामगिरी केली असली, तरी या स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. साखळी फेरीत न्यूझीलंड आणि ‘अव्वल आठ’ फेरीत अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत केले.

हेही वाचा >>> रॉबिन्सनच्या एका षटकात तब्बल ४३ धावा

अफगाणिस्तानकडून संपूर्ण स्पर्धेत कर्णधार रशीद खानने चमकदार कामगिरी केली आहे. वेगवान गोलंदाज फझलहक फरुकी आणि नवीन-उल-हक संघाला चांगली सुरुवात करून देत आहेत. गुलबदिन नैब आणि मोहम्मद नबी यांनीही वेळोवेळी योगदान दिले आहे. सलामीवीर रहमानुल्ला गुरबाझ स्पर्धेतील सर्वाधिक धावा (२८१) करणारा फलंदाज आणि फरुकी सर्वाधिक बळी (१६) मिळवणारा गोलंदाज आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेला पराभूत करायचे झाल्यास अफगाणिस्तानला आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत काही चुरशीचे सामने जिंकले आहेत. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल १० फलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या केवळ क्विंटन डिकॉकचा समावेश आहे. त्याने सात सामन्यांत १९९ धावा केल्या आहेत. आता दक्षिण आफ्रिका यावेळी तरी उपांत्य फेरीचा अडथळा पार करून आपल्यावरील ‘चोकर्स’चा शिक्का पुसणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

● वेळ : पहाटे ६ वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, , १ हिंदी, हॉटस्टार अॅप