–  नामदेव कुंभार
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा सध्या अंतिम टप्प्यात आहे. या स्पर्धेतून अफगाणिस्तानने भविष्यात आपण जायंट किलर ठरू हे सिद्ध केले आहे. साखळी आणि सुपर फोरच्या लढतीमधील सामन्यात अफगाणिस्तान संघाने आपली छाप सोडली. पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्धचे सामने अगदी थोडक्यात संघाच्या हातून गेले. मात्र दोन वेळा हाता तोंडाशी आलेला घास पडला असतानाही निराश न होता तेवढ्याच दृढ निश्चयाने बलाढ्य भारताविरोधात मैदानात उतरत सामना बरोबरीत सोडवून स्पर्धेचा शेवट गोड केला. आशिया चषकाच्या सुरूवातीला अफगाणिस्तान संघाला दुबळा संघ मानले गेले होते. पण आशिया चषकाच्या शेवटापर्यंत या संघाने सर्वांच्या मनात घर केले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अफगाणिस्तान संघ झपाट्याने नावारुपास येत असल्याचे मागील काही वर्षांमध्ये दिसून आले. आणि आशिया चषक स्पर्धा या प्रगतीचा कळस ठरली असे म्हणता येईल. गेल्या दोन वर्षांतील अफगाणिस्तान संघाची कामगिरी, विशेष करून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहिल्यास कळून येईल की त्यांनी किती जबरदस्त प्रगती केली आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशसारख्या संघांला अफगाणिस्तान संघाने आपली ताकद दाखवून दिली. जर या संघाला अनुभवाची आणि नशीबाची थोडी साथ मिळाली असती तर उद्या होणाऱ्या आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पुन्हा एकदा अफगाणिस्तान भारताविरुद्ध खेळताना दिसला असता. आगामी काळात जागतिक क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानने आपले वेगळे स्थान निर्माण केल्यास कोणालाही आश्चर्य वाटणार नाही. अजगर अफगाणच्या नेतृत्वाखालील या संघाने आशिया चषकामध्ये आपल्या क्षमतेपेक्षा चांगला खेळ केला आहे. अनेकदा त्यांनी आपण ‘अंडर डॉग’ नसून जेतेपदाचे दावेदार असल्यासारखा खेळ केला असं क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे. यातच त्यांच्या खेळाचे कौशल्य दिसून येते.

या स्पर्धेत अफगाण संघाची कामगिरी उल्लेखनिय ठरली. भारताविरोधात सामना बरोबरीत सोडला तर ‘सुपर फोर’ गटामध्ये अफगाण संघ पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्ध अखेरच्या षटकात हरला. त्यांच्यामध्ये अनुभवाची कमतरता दिसून आली. नाहीतर हे दोन्ही सामने ते जिंकू शकत होते. या स्पर्धेत फक्त एक सहभागी संघ म्हणून आमच्याकडे पाहू नका आम्ही विजयाचे दावेदार म्हणून आलो आहोत असे दाखवून दिले. अफगाणिस्तानी संघामध्ये युवा आणि वेगवेगळ्या स्पर्धांमधून खेळलेल्या अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे. या संघातील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर आपण म्हणू शकतो की येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा संघ जागतिक क्रिकेटमध्ये आपले ठसा उमटवेल.

स्पर्धेवर नजर टाकल्यास एक गोष्ट कळेल की, अफगाण संघाची फलंदाजी थोडी कमजोर असली तरी गोलंदाजी ही या नवख्या संघाची प्रमुख ताकद आहे. राशिद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब रहमान हे त्रिकुट कोणत्याही संघाला आपल्या फिरकीच्या तालावर नाचवू शकते. भारताविरोधातील सामन्याचेच उदाहरण घ्या ना. या सामन्यात शेवटच्या षटकात फक्त ९ धावा वाचवायच्या होत्या. त्यावेळी समोर रविंद्र जाडेजासारखा आक्रमक फलंदाज होता तरीही राशिद खानने आपल्या जादुई फिरकीच्या जोरावर केवळ 8 धावा देत हा सामना बरोबरीत सोडला. आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत राशीद दुसऱ्या तर टी-२०च्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. एकदिवसीय क्रमवारीमध्ये अव्वल २५ गोलंदाजांमध्ये अफगाणिस्तान संघाच्या तीन गोलंदाजांचा समावेश आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकासारख्या संघासबोत सामने न खेळता अफगाणिस्तान संघाचे गोलंदाज आयसीसी क्रमवारीत अव्वल २५ मध्ये आहेत हे विशेष. यावरून या संघाच्या गोलंदाजीची धार कशी असेल याचे अनुमान सहज लावता येते.

गोलंदाजीच्या तुलनेत अफगाणिस्तान संघाची फलंदाजी तितकीशी दर्जेदार नसली तरी नवव्या क्रमांकावरील फलंदाजातही समोरच्या संघातील गोलंदाजाची पिसे काढण्याची क्षमता आहे. सलामीवीर मोहम्मद शहजादच्या नावावार पाच शतके आहेत. भारताविरोधातील सामन्यात शहजादने दमदार फलंदाजी करत शतक साजरे केले त्याचबरोबर संघाला सन्माजनक धावसंख्या उभी करण्यात मोलाचा वाटा उचलला. मधल्या फळीमध्ये मोहम्मद नबी आणि अजगर अफगानसारखे फंलदाज गेल्या काही सामन्यांपासून कठीण परिस्थीतीत अडकलेल्या संघाला सावरण्याचे काम अगदी चोख बजावत आहेत. गोलंदाजी आणि फलंदाजीनंतर क्षेत्ररक्षणातही हा संघ दर्जेदार आहे. आशिया चषक स्पर्धेबद्दलच बोलायचे झाले तर अफगाणिस्तान संघ हा क्षेत्ररक्षणात पाकिस्तानपेक्षा सरस ठरला. भारताविरोधातील सामन्यात मौक्याच्या क्षणी अफगाणी क्षेत्ररक्षकांनी भारताच्या तीन फलंदाजांना धावबाद केले अन् सामन्याचे चित्रच पालटले.

अफगाणिस्तान संघाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते शेवटपर्यंत हार मानत नाहीत. ही कला सर्वच संघांकडे असते असे नाही. दक्षिण आफ्रिकेसारखा बलाढ्य संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर चोकर्स म्हणजे मौक्याच्या क्षणी कच खाणारा संघ म्हणून (कु)प्रसिद्ध आहे. त्यामुळेच अफगाण संघाकडे असणारे हे फायटिंग स्पिरीटच त्यांचा युएसपी आहे. ही स्पर्धा जरी आशियातील संघांसाठी मर्यादीत असली तरी जगभरातील क्रिकेट चाहते या अफगाणी संघाने मैदानात दाखवलेल्या स्पिरीटच्या आणि त्यांच्या खेळाच्या प्रेमात पडलेले दिसत आहेत. म्हणूनच भविष्यात आयसीसीने या संघाला तगड्या संघांबरोबर सामने खेळण्याची जास्तीत जास्त संधी दिल्यास खरं तर क्रिकेटचाच फायदा होईल. कारण आता या संघापेक्षा जास्त क्रिकेट चाहत्यांना या नवख्या संघाला मैदानात पाहण्याची उत्सुकता लागून राहिलेली आहे.