सध्या खराब कामगिरीमुळे भारतीय संघाबाहेर असलेल्या युवराज सिंहने आपल्या निवृत्तीविषयीच्या चर्चांवर आपली प्रतिक्रीया दिलेली आहे. आपण २०१९ विश्वचषकापर्यंत क्रिकेट खेळत राहणार असून, यानंतरच निवृत्तीचा निर्णय घेऊ असं युवराजने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. २०१७ सालात जून महिन्यात युवराज सिंह भारताकडून शेवटचा वन-डे सामना खेळला होता. मात्र यानंतर त्याची संघात निवड झालेली नाही. मात्र आगामी आयपीएलच्या हंगामातून संघात पुनरागमन करण्याचा आपला मानस असल्याचंही युवराज सिंह म्हणाला.
“२०१८ सालातलं आयपीएल ही माझ्यासाठी महत्वाची स्पर्धा ठरणार आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी केली तरच मला २०१९ सालात खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे २०१९ पर्यंत मी क्रिकेट खेळत राहणार आहे. त्यानंतर परिस्थिती आणि मिळणाऱ्या संधी लक्षात घेऊन योग्य वेळी निवृत्तीचा निर्णय घेईन.” एका खासगी क्रीडा वितरण पुरस्कार सोहळ्यात युवराजने आपलं मत मांडलं.
२०११ विश्वचषकापर्यंत युवराज सिंह भारतीय संघाचा अविभाज्य भाग मानला जायचा. कसोटी क्रिकेटमध्ये कमी संधी मिळाल्या असल्या तरीही वन-डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये युवराजला भरपूर संधी मिळाल्या. मात्र मध्येच कॅन्सरचं निदान झाल्यामुळे, युवराज क्रिकेटपासून दुरावला. चुकीच्या वयात झालेल्या कॅन्सरच्या आजारामुळे आपल्या अनेक संधी हुकल्याचंही युवराजने प्रांजळपणे मान्य केलं. यावेळी युवराज सिंहने दक्षिण आफ्रिका दौरा गाजवणाऱ्या भारतीय संघाचंही कौतुक केलं.