बडोद्याचा क्रिकेटर विष्णू सोलंकीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या नवजात मुलीचे निधन झाले आणि आता त्याच्या वडिलांनी या जगाचा निरोप घेतला आहे. विष्णू भुवनेश्वरमध्ये चंदीगडविरुद्ध रणजी ट्रॉफी खेळत होता. हा सामना अनिर्णित राहिला. ”विष्णूने त्याच्या वडिलांचे अंतिम संस्कार ड्रेसिंग रूमच्या एका कोपऱ्यात व्हिडिओ कॉलवर पाहिले. हे त्याच्यासाठी खरोखर कठीण होते, परंतु त्याने दाखवलेले धैर्य उल्लेखनीय आहे”, असे बडोद्याचा कर्णधार केदार देवधरने म्हटले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवजात मुलीचे अंतिम संस्कार करून परतल्यानंतर, विष्णूने चंदीगडविरुद्धच्या सामन्यात शतक ठोकले होते. वैयक्तिक दु:ख मागे ठेवून त्याने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अप्रतिम शतक झळकावले. भुवनेश्वरमधील एलिट ग्रुप बीच्या (फेरी २) या सामन्यात त्याने ही अप्रतिम कामगिरी केली.

२९ वर्षीय विष्णूला ११ फेब्रुवारीच्या रात्री त्याच्या मुलीच्या जन्माची बातमी मिळाली. मात्र, २४ तासांतच मुलीचा मृत्यू झाला. विष्णू तेव्हा भुवनेश्वरमध्ये होता. त्याने बडोद्याला जाऊन आपल्या मुलीच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली. मात्र, तीन दिवसांनंतर तो विमानाने भुवनेश्वर संघात परतला.

हेही वाचा – IND vs SL : वन मॅन आर्मी..! मुंबईकर श्रेयस अय्यरनं मोडला विराट कोहलीचा ‘मोठा’ रेकॉर्ड

पहिल्या सामन्यात बडोद्याचा बंगालकडून चार विकेटने पराभव झाला होता, या सामन्यात विष्णू खेळला नाही. क्वारंटाइन पूर्ण केल्यानंतर तो संघात सामील झाला. त्याने २३ फेब्रुवारी रोजी नेट सेशन केले. २४ फेब्रुवारीपासून संघाचा चंदीगडशी सामना होता. विष्णूने २०१५मध्ये तामिळनाडूविरुद्ध पदार्पण केले होते. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५०० हून अधिक धावा केल्या आहेत तर लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने १००० हून अधिक धावा केल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After baby girl vishnu solanki loses his father plays ranji game adn