‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्या अडचणी काही केल्या कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंवर बंदीची शिक्षा घातल्यानंतर, कंपन्यांनीही या दोन खेळाडूंकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय. अनेक मान्यवर कंपन्यांनी हार्दिक आणि राहुलसोबतचा करार मोडला आहे.
अवश्य वाचा – हार्दिक-राहुलवर घातलेली बंदी योग्यच – हरभजन सिंह
Gillete Match3 या कंपनीने हार्दिकसोबतचा आपला करार मोडला असून, हार्दिकने केलेल्या वक्तव्याशी कंपनी कोणत्याही प्रकारे संबंध ठेऊ इच्छित नसल्याचं कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे जोपर्यंत हार्दिकच्या चौकशीचा निकाल येत नाही तोपर्यंत कंपनी त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारे संबंध ठेऊ इच्छित नसल्याचंही प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हार्दिक प्रमाणे लोकेश राहुलही जर्मन स्पोर्ट्स शूज कंपनी प्यूमा, बंगळुरुतील फिटनेस स्टार्टअप क्युअरफिट आणि अन्य काही कंपन्यांचा ब्रँड अँबेसेडर म्हणून काम करतो. सेलिब्रेटी आणि खेळाडूंनी केलेली आक्षेपार्ह विधानं आमच्या ब्रँडसाठी फायदेशीर नसतात. जनमानसात यामुळे ब्रँडची नकारात्मक बाजू उभी राहण्याची शक्यता असल्यामुळे कंपन्या दोन्ही खेळाडूंसोबत सध्या कोणत्याही प्रकारे संबंध ठेवण्यात उत्सुक नाहीयेत. त्यामुळे दोन्ही खेळाडूंविरुद्ध चौकशीचा नेमका काय निकाल लागतोय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.